पुणे – शहरात पुन्हा एकदा हिट अँड रनचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवले ब्रिजजवळ भरधाव वेगात असलेल्या मर्सिडीज कारने एका दुचाकीस्वाराला उडवल्याने चिंचवडमधील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव कुणाल हुशार (राहणार – चिंचवड) असे असून, ही घटना शनिवारी (३ मे २०२५) पहाटे सुमारे चारच्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की कारची दुचाकीला जोरदार धडक बसल्यानंतर कुणाल यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. स्थानिक नागरिकांनी मर्सिडीज चालकाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. नागरिकांचा असा आरोप आहे की, मर्सिडीज चालवणारा आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता. पोलिसांनी या आरोपाची नोंद घेतली असून चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मर्सिडीज चालकाला अटक करण्यात आली आहे. कायदेशीर सर्व प्रक्रिया पार पाडली जात असून, नागरिकांनी या प्रकरणात कोणतीही अफवा पसरवू नये, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
या घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षा, हायप्रोफाईल वाहनधारकांची बेफिकिरी आणि मद्यधुंद अवस्थेतील वाहनचालकांवर कारवाईचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. तरुण कुणाल हुशार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पुढील तपास: पोलिसांनी चालकाची वैद्यकीय तपासणी करून अधिकृत अहवालाची वाट पाहत आहेत. तसेच, अपघातग्रस्त गाडी जप्त करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजद्वारे अपघाताचा तपशील शोधण्याचे काम सुरू आहे.