पुणे – शहरात अवैध शस्त्रवहनाला आळा घालण्यासाठी कार्यरत असलेल्या भारती विद्यापीठ पोलिसांनी नुकतीच एक मोठी कारवाई केली असून एका अवघ्या १७ वर्षाच्या विधीसंघर्षित बालकाकडून गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत राऊंड जप्त करण्यात आले आहे. ही घटना २९ एप्रिल २०२५ रोजी घडली असून या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांच्या नेतृत्वात एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. हे पथक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत नियमित पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी आणि सागर बोरगे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कात्रज-मांगडेवाडी रोडवर रतन मोटर्स प्रा. लि. समोर एक इसम शस्त्रासह थांबलेला आहे.
या माहितीवरून पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित ठिकाणी धाव घेतली. तेथे एक १७ वर्षीय विधीसंघर्षित बालक संशयास्पदरीत्या आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ ५०,०००/- रुपये किंमतीचा गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस मिळाले. एकूण ५०,५००/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत पुढील तपास सुरू आहे. बालकाची चौकशी सुरु असून त्याच्या मागे कोणी गुन्हेगारी टोळी आहे का याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
या यशस्वी कारवाईमागे पुढील अधिकाऱ्यांचा मोलाचा वाटा: पोलीस उप आयुक्त (परिमंडळ २) श्रीमती स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग श्री. राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांच्यासह मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार आणि संदीप आगळे यांच्या समावेश होता.
ही कारवाई अवैध शस्त्रवहन करणा-यांवर मोठा दणका असून पुणे शहर पोलिसांचे गुन्हेगारी विरोधातील प्रयत्न यशस्वी ठरत असल्याचे यातून दिसून येते.