पुणे – पुणे शहरातील गुन्हेगारीच्या साखळीत मोठा खंड पडला असून, ‘चोर राजा’ म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या राजेश राम पपुल या सराईत गुन्हेगारास त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या आरोपीकडून तब्बल ८ घरफोडी गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, चोरीस गेलेल्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या सोनारालाही अखेर अटक करण्यात आली आहे.
ही धडाकेबाज कामगिरी हडपसर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केली आहे. मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५, श्री. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय मोगले यांच्या सूचनेनुसार तपास पथकाने मोठ्या शिताफीने आणि मेहनतीने या गुन्ह्यांचा छडा लावला.
घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये एक विशेष नमुना लक्षात आल्याने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. दि. १७ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या घरफोडीत एक इसम स्प्लेंडर गाडीवरून येऊन घरफोडी करत असल्याचे स्पष्ट झाले. त्या आधारावर राजेश पपुल (वय ४०) व प्रदीप ऊर्फ गणेश गाडे (वय ३५) यांना अटक करण्यात आली. त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली असून, यामध्ये हडपसर परिसरातील एकूण ८ घरफोड्यांचा समावेश आहे.
चोरीस गेलेले दागिने पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील सोनार कुणाल वाफगावकर यास वेळोवेळी विकण्यात आले होते. पोलिसांनी त्याला नोटीस देऊन तपासासाठी बोलावले होते. मात्र तो अनुपस्थित राहिल्याने त्यालाही अखेर अटक करण्यात आली.
चोरी करताना आरोपी विविध युक्त्या वापरत असत – दुचाकी वेळोवेळी बदलणे, मास्कचा वापर, कपडे बदलणे, रिक्षाचा वापर – अशा उपाययोजना करून ते पोलिसांना गाफील ठेवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, तपास पथकातील अधिकाऱ्यांनी तब्बल ७०० किमी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा तपास घेत आणि खबऱ्यांकडून माहिती गोळा करत आरोपींचा माग काढला.
या यशस्वी कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे, सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अनिल बिनवडे व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी विशेष मेहनत घेतली.
या कारवाईने पुणे शहरात पुन्हा एकदा पोलिसांनी गुन्हेगारांना दिलेला इशारा स्पष्ट झाला आहे की कायदा सुव्यवस्थेच्या रक्षकांना गाफील ठेवणे अशक्य आहे.