पुणे – पुण्यातील बिबवेवाडी परिसरात ५.२५ लाख रुपयांचे सोनं चोरीला गेलेल्या घरफोडी प्रकरणाचा यशस्वी छडा लावून पोलिसांनी दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल मूळ मालकास परत दिला आहे. यानंतर प्रभावित नागरिकाने पुणे पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
ही घटना दिनांक २३ मे २०२४ रोजी रात्री ११ ते २४ मे सकाळी ८ च्या दरम्यान घडली. फिर्यादी श्री. श्रीनिवास श्रीकांत रेवले (वय ५३, रा. गणेश गार्डन, बिबवेवाडी, पुणे) यांनी आपल्या मामाच्या – जितेंद्र गंगाधर साखरे यांच्या मालकीच्या ‘गुंफन अपार्टमेंट’, बिबवेवाडी येथील फ्लॅटमध्ये घडलेल्या घरफोडीबाबत तक्रार दिली होती.
अज्ञात चोरट्यांनी लोखंडी व लाकडी दरवाजाचे कोयंडे कापून फ्लॅटमध्ये प्रवेश केला व मास्टर बेडरुममधील कपाटाचे लॉकर उचकटून त्यातून मौल्यवान दागिने चोरून नेले. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३२/२०२४ नोंदविण्यात आला होता.
पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून आरोपी १) विकी सिंग कल्याणी (वय ३५, रा. हडपसर) व २) अब्दुला ताहिरबक्ष शेख (वय ५८, रा. पोरवाल रोड, धानोरी) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ९५ ग्रॅम सोन्याची लगड, किंमत सुमारे ५,२५,००० रुपये हस्तगत करण्यात आली.
सदर जप्त मुद्देमाल मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (कोर्ट क्र. ४, शिवाजीनगर) यांच्या आदेशानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शंकर साळुंखे यांच्या हस्ते मूळ मालक जितेंद्र साखरे यांच्याकडे सोपवण्यात आला. यावेळी साखरे यांनी पुणे पोलिसांचे मनापासून आभार मानले.
या गुन्ह्याच्या यशस्वी उकल व मुद्देमाल परत मिळवून देण्यामागे अनेक अधिकाऱ्यांची मेहनत असून, यामध्ये अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ५) डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त (वानवडी विभाग) श्री. धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शन लाभले.
या तपासात पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, महिला पोलीस अंमलदार मुजुमले व जाधव, पोलीस अंमलदार पाटील, चिकणे, वलटे, शेंद्रे, साळुंखे यांनी परिश्रम घेतले.
या कामगिरीमुळे बिबवेवाडी परिसरातील नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांची तत्परता व कार्यक्षम तपास कौशल्य पुन्हा अधोरेखित झाले आहे.