Home Breaking News चोरट्यांकडून दोन दुचाकी जप्त! भारती विद्यापीठ पोलिसांची तत्परता; दुचाकी चोरी प्रकरणाचा पर्दाफाश

चोरट्यांकडून दोन दुचाकी जप्त! भारती विद्यापीठ पोलिसांची तत्परता; दुचाकी चोरी प्रकरणाचा पर्दाफाश

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने दुचाकी चोरी प्रकरणात महत्त्वाची कामगिरी बजावत एकाच आरोपीकडून दोन दुचाकी गाड्या जप्त करून वाहन चोरीचा मोठा कट उध्वस्त केला आहे. ही कारवाई पोलिसांनी प्रचंड बारकाईने आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केली असून, आरोपीकडून आणखी चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी, स्पाईस गार्डन हॉटेल लेकटाऊन, पुणे येथे फिर्यादी व्यक्तीने त्यांची होंडा अ‍ॅक्टिव्हा दुचाकी सुरक्षितपणे लॉक करून पार्क केली होती. परंतु काही वेळातच अज्ञात चोरट्याने ती गाडी चोरून नेल्याचे उघडकीस आले. फिर्यादीच्या तक्रारीवरून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम पु. साळगावकर यांनी तात्काळ तपास पथक तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू करण्याचे आदेश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व त्यांच्या तपास पथकाने कार्यवाहीला गती दिली. अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे आदींनी संयुक्त तपास करत आरोपीचा माग काढला.

तपासदरम्यान आरोपी किरण लक्ष्मण जांभळे (वय ३६, रा. अपर इंदिरानगर, पुणे) याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, चोरी केलेली अ‍ॅक्टिव्हा दुचाकी त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली. त्याचप्रमाणे, अधिक तपास करत असताना, गुन्हा रजिस्टर नंबर २०६/२०२५ अन्वये यमाहा कंपनीची आर.एक्स.१०० (नं. MJJ6689) ही गाडी देखील आरोपीकडून जप्त करण्यात आली.

सदर गुन्ह्यात आरोपीचा वाहन चोरीसाठीचा पूर्वग्रह आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात असून, तो वाहनचोरीच्या साखळीचा भाग असल्याचा संशय पोलीस व्यक्त करत आहेत. पोलीस तपास पथक त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घेत आहे.

ही संपूर्ण यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सहभागी अधिकारी व अंमलदार:
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम पु. साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राहुल कुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, तसेच अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, सुतार व संदीप आगळे यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही कारवाई शक्य झाली.

पोलिसांकडून अपील करण्यात आले आहे की, नागरिकांनी आपल्या वाहनांना पार्क करताना योग्य सुरक्षा यंत्रणा वापराव्यात आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.