Home Breaking News बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश: शिवाजीनगर पोलिसांची सायबर पथकाची मोठी कारवाई

बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश: शिवाजीनगर पोलिसांची सायबर पथकाची मोठी कारवाई

133
0

पुणे – शहरात आर्थिक फसवणूक घडवणाऱ्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीवर शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाने मोठी कारवाई करत पर्दाफाश केला आहे. यामध्ये तब्बल ₹२८,६६,१०० किंमतीच्या बनावट नोटा, प्रिंटर, शाई, नोटा छापण्याचे साहित्य आणि वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. या कारवाईने पुणे शहरात बनावट चलन तयार करून बाजारात पसरवण्याचा डाव उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

घटनेचा तपशील:
१७ एप्रिल २०२५ रोजी कोटक महिंद्रा बँकेच्या व्यवस्थापकांनी शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती की त्यांच्या सीडीएम मशीनमध्ये ₹२०० दराच्या ५५ बनावट नोटा जमा झाल्या आहेत. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भा.दं.वि. कलम १७८, १७९, १८० अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि तत्काळ सायबर पथक तांत्रिक विश्लेषणासाठी सक्रिय केले.

तपास व अटकेची साखळी:
तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी प्रथम मनिषा स्वप्निल ठाणेकर, भारती तानाजी गवंड, आणि सचिन रामचंद्र यमगर या तिघांना अटक केली. चौकशीत त्यांच्याकडून माहिती मिळाली की, त्यांनी बनावट नोटा नरेश भिमप्पा शेटटी या व्यक्तीकडून घेतल्या होत्या. त्याच्या लोहगाव येथील घरी छापा टाकण्यात आला असता तब्बल ₹२२,३२,००० किमतीच्या बनावट नोटा, प्रिंटर, शाई, आणि नोटा छापण्याचे साहित्य सापडले.

तपास अधिक खोलवर चालू ठेवत, पोलिसांनी आणखी एका आरोपीचा म्हणजे प्रभू लक्ष्मण गुगलजेडडी याचा शोध घेऊन त्यालाही अटक केली. त्याच्याकडून ₹३,००० किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.

संपूर्ण कारवाईमध्ये पोलिसांनी खालील प्रमाणे जप्ती केली आहे:

  • ₹२०० व ₹५०० दराच्या एकूण २८,६६,१०० किमतीच्या बनावट नोटा

  • ₹२,०४,००० खऱ्या नोटा

  • नोटा छापणारे प्रिंटर, शाई, ए-४ साईज कोरे कागद

  • आरोपींची वापरलेली कार (MH 12 WK 3761)

पोलीस यंत्रणेची मेहनत:
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, उपआयुक्त संदिपसिंह गिल्ल, सहाय्यक आयुक्त साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सायबर पथकातील अजित बडे, नलिनी क्षिरसागर, तेजस चोपडे, आदेश चलवादी, गणेश जाधवर, श्रीकृष्ण सांगवे यांचा तपासात मोलाचा वाटा राहिला.

पोलिसांकडून सतर्कतेचे आवाहन:
पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की, कुठल्याही संशयास्पद नोटा आढळल्यास तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये कळवाव्यात. बनावट नोटा चलनात मिसळल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवर घातक परिणाम होतो.