पुणे – वानवडी परिसरातील शांतीनगर येथे ताडीच्या दुकानात खून झाल्याप्रकरणी अवघ्या ६ तासांत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने आरोपींना ताब्यात घेत संपूर्ण शहराचे लक्ष वेधले आहे.
दि. २५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ४.४५ वाजता, शांतीनगर, वानवडी येथील सरकारमान्य ताडीच्या दुकानावर झालेल्या वादात मलंग महेबुब कुरेशी (वय ६०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) यांची निर्दयपणे हत्या करण्यात आली. आदिल शेख, आकाश धांडे व ‘पांडा’ नावाच्या तिघा आरोपींनी मिळून ताडी पिण्याच्या कारणावरून हा हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १७८/२०२५ कलम १०३(१), ११५(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार झाले होते आणि पोलीसांना गुंगारा देत होते. मात्र, पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने अविरत प्रयत्न करत अवघ्या काही तासांतच दोघा आरोपींचा शोध लावला.
सहा. पोलीस फौजदार राजस शेख व पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी अदिल हनीफ शेख (३१) व पांडुरंग उर्फ ‘पांडा’ नामदेव पवार (५०) यांना कोंढवा खुर्द येथील कोहिनूर सोसायटीजवळ सार्वजनिक रस्त्यावरून अटक करण्यात आली.
विशेष म्हणजे, पांडुरंग पवार हा आधीपासूनच पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.
या संपूर्ण ऑपरेशनमध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, आणि सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-१) गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पडली.
तपास पथकात सहा. पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार राजस शेख, पृथ्वीराज पांडुळे, विनोद शिवले, प्रमोद टिळेकर, अमित कांबळे, महिला अंमलदार पल्लवी मोरे, स्वाती तुपे, यांच्यासह संपूर्ण युनिट ५ च्या टीमने ही कारवाई अत्यंत कुशलतेने पार पाडली.