पुणे – हडपसर परिसरातील मांजरी येथे उघड्या दरवाजाचा फायदा घेत तीन मोबाईल चोरी करणाऱ्या एका तरुण चोरट्याला हडपसर पोलीसांनी अल्पावधीतच अटक केली आहे. ही घटना २२ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११ वाजता ते २३ एप्रिल सकाळी ६ वाजेच्या दरम्यान जाई रेसीडन्सी, मांजरी, पुणे येथे घडली.
फिर्यादी आणि त्यांचे मित्र प्लॅटमध्ये दरवाजा अर्धवट उघडा ठेवून झोपले होते. या संधीचा फायदा घेत एक अज्ञात चोरटा घरात घुसून तीन मोबाईल फोन चोरी करून पसार झाला. चोरी झाल्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४१०/२०२५ भारतीय दंड संहिता कलम ३८० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक तपास पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान, गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कैन्हयालाल चेलाराम नटमारवाडी (वय २०, रा. निता हॉटेल जवळ, लोणावळा) यास ताब्यात घेण्यात आले.
त्याच्याकडे कौशल्यपूर्ण आणि सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरीस गेलेले तीन मोबाईल – रेडमी नोट १०, विवो V50, आणि विवो 200 – एकूण किंमत सुमारे ₹४०,०००/- हस्तगत करून पोलिसांनी जप्त केले.
या कामगिरीत पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार दिपक कांबळे, महावीर लोंढे यांचा मोलाचा सहभाग होता. या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार राजश्री खैरे या करत आहेत.
ही संपूर्ण कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व) श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हडपसर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने वेळेवर कारवाई करून एक महत्त्वाचा गुन्हा उघडकीस आणत चोरट्याचा बंदोबस्त केला.