Home Breaking News समृद्ध कलेचा साक्षात्कार! त्रिशुंड गणेश मंदिरात आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या पूर्वसंध्येला नटरंग अकॅडमीचा...

समृद्ध कलेचा साक्षात्कार! त्रिशुंड गणेश मंदिरात आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या पूर्वसंध्येला नटरंग अकॅडमीचा मंत्रमुग्ध करणारा नृत्याविष्कार

पुणे, सोमवार पेठ – भारताचा हजारो वर्षांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि नृत्यकलेची परंपरा जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या पूर्वसंध्येला एक आगळावेगळा आणि अभिजात सांस्कृतिक कार्यक्रम पुण्यात पार पडला.

सुमारे 300 वर्षे जुन्या आणि ऐतिहासिक वास्तू असलेल्या श्री त्रिशुंड गणेश मंदिराच्या प्रांगणात पारंपरिक भरतनाट्यम नृत्यप्रकार सादर करत नटरंग अकॅडमीच्या युवा कलाकारांनी रसिकांची मने जिंकली.

या विशेष कार्यक्रमाचे आयोजन साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि श्री त्रिशुंड मयुरेश्वर विजय मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. सांस्कृतिक जाणीव आणि परंपरेच्या जपणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवत मंदिराच्या पवित्र आणि शांत वातावरणात हे सादरीकरण अधिकच प्रभावी ठरले.

कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत नृत्यगुरू स्वाती ताई दातार आणि शाहीर हेमंत मावळे यांचा समावेश होता. त्यांनी आपल्या भाषणांतून भारतीय शास्त्रीय कलेच्या सातत्याने संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुण कलाकारांचे कौतुक केले आणि या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे समन्वयक पीयूष शाह (साईनाथ मंडळ ट्रस्ट) व सचिन पवार (श्री त्रिशुंड मयुरेश्वर विजय मंडळ ट्रस्ट) यांनी सांगितले की, “या मंदिराचा परिसर केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही अत्यंत समृद्ध आहे. पुढील काळातही असेच उपक्रम सातत्याने राबवले जातील.”

नटरंग अकॅडमीच्या कलाकारांनी विविध पारंपरिक नृत्य प्रकारांद्वारे भारतीय संस्कृतीतील देवत्व, भक्तीभाव, नारीशक्ती आणि निसर्गसौंदर्य सादर करत उपस्थित रसिकांची मने जिंकली. प्रत्येक नृत्याविष्कारामागे असलेली संस्कृतीची जाण, शिस्तबद्धता आणि कलाविष्कार पाहून उपस्थित श्रोते भारावून गेले. या कार्यक्रमामुळे नव्या पिढीत भारतीय नृत्यकलेची ओळख निर्माण होऊन परंपरा जपण्याची प्रेरणा मिळाली आहे.