Home Breaking News पाहुणचारासाठी गेले आणि मृतदेहात परतले; एका बहिणीचा करुण हंबरडा – ‘सर्व काही...

पाहुणचारासाठी गेले आणि मृतदेहात परतले; एका बहिणीचा करुण हंबरडा – ‘सर्व काही उद्ध्वस्त झालं, आता जगायचं तरी कसं?’

मुंबई – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील अतुल माने, संजय लक्ष्मण लेले आणि हेमंत जोशी या तिघांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजश्री अकुल या मयत अतुल माने यांच्या पत्नीच्या बहिणीने दिलेल्या माहितीने संपूर्ण महाराष्ट्राला हेलावून सोडलं आहे.

“ते त्यांच्या पोटात, डोक्यात आणि छातीत गोळ्या झाडत होते – माझ्या बहिणीच्या डोळ्यांसमोर!”

राजश्री म्हणाल्या, “माझ्या बहिणीसमोरच तिच्या नवऱ्यावर गोळी झाडली गेली… ती म्हणत होती, तो वाचेल कदाचित… पण नाही वाचला. संजय लेले यांच्या डोक्यात, हेमंत जोशी यांच्या छातीत, आणि अतुल माने यांच्या पोटात गोळ्या झाडल्या. ते फक्त पुरुषांनाच टार्गेट करत होते.”

‘२६/११ नंतरचा सगळ्यात मोठा हल्ला’ – रागावलेले नातेवाईक

राजश्रींचे पती राहुल अकुल म्हणाले, “ही घटना २६/११ नंतरची सगळ्यात मोठी दहशतवादी कारवाई आहे. या मागे मोठं संघटित कट रचणारी दहशतवादी टोळी आहे. यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आणि या कुटुंबांना सरकारने मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली पाहिजे.”

शिक्षण घेणाऱ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त

राजश्री म्हणाल्या, “माझी बहिण अनुष्का ही गृहिणी आहे, आणि तिची मुलगी ऋचा ही ज्युनियर कॉलेजला शिकते. सीए होण्याचं स्वप्न पाहणारी ऋचा आता पूर्णपणे खचली आहे. त्यांचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. आता त्या दोघींना कोण सावरायचं?”

‘मेंदूने समजत नाही की काय घडलं, पण मनाला वेदना सोसवत नाही’

राजश्रीने सांगितलं, “माझ्या बहिणीनं मयत नवऱ्याचा चेहरा पाहिला, पण काहीही बोलू शकली नाही. फक्त हुंदके, अश्रू आणि वेदना! आम्ही कोकणात भेटायचं ठरवलं होतं मे महिन्यात. आता ती योजना नव्हे, एक कटू आठवण उरलीय.”

“पहलगाममध्ये पुरुषांचाच बळी घेतला… मुलीला CA व्हायचं होतं, आता काय?” – ठाण्यातील कुटुंबाचा हृदयद्रावक आक्रोश