सायबर क्राईमसारख्या गंभीर विषयावर देशभरात जनजागृतीची गरज असताना, धुळे शहरात नुकतीच भारतातील पहिली ‘सायबर कॉन्क्लेव्ह’- एक राष्ट्रीय परिषद-यशस्वीरीत्या पार पडली. या उपक्रमाचे आयोजन प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ऍड. चैतन्य भंडारी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. सभागृह हाऊसफुल्ल होता, आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमात ऊर्जा आणि उत्सुकता यांचा उत्स्फूर्त संगम पाहायला मिळाला.
या कॉन्क्लेव्हमध्ये डॉ. धनंजय देशपांडे (DD) यांचे अनुभव, उपक्रमशील विचार आणि त्यांची मिश्किल शैली कार्यक्रमाचे खरे आकर्षण ठरले. पॅनल डिस्कशनदरम्यान एका प्रेक्षकाने “डिजिटल अरेस्ट” या वाढत्या सायबर फ्रॉडविषयी प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना ऍडिशनल कमिशनर श्री किशोर काळे यांनी स्पष्ट सांगितले, की पोलीस कधीही व्हिडिओ कॉलवरून कुणाला अटक करत नाहीत, आणि “डिजिटल अरेस्ट” नावाची कोणतीही वैध प्रक्रिया अस्तित्वातच नाही. त्यांनी सांगितले, की अशा प्रकरणांपासून सावध राहा आणि पोलिसांवर विश्वास ठेवा.
त्यानंतर काळे साहेबांनी थेट डॉ. देशपांडे यांना माईक दिला आणि म्हटले, “आता पुढचं तुम्ही सांगा!”
त्यावर डॉ. देशपांडे यांनी प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच रंग भरला. त्यांनी मिश्किल आणि रंजनात्मक पद्धतीने सांगितले की,
“तुम्ही घाबरता, म्हणून ते लुटतात. जर कोणी म्हणालं की मुलाच्या बॅगेत ड्रग्स सापडले, तर सरळ म्हणायचं — ‘नालायकच आहे तो, टाका जेलमध्ये, आणि चार दंडके ठोका वरून!’”
यावर उपस्थित प्रेक्षक आणि खुद्द काळे साहेब खळखळून हसले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
डॉ. देशपांडे यांनी स्पष्ट केले की, डिजिटल अरेस्ट ही एक सायबर गुन्ह्याची नवी ट्रिक असून, लोकांच्या भावनांशी खेळून त्यांना लुबाडण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक नामवंत व्यक्ती सुद्धा या जाळ्यात अडकले असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पण हे टाळण्यासाठी पॅनिक न होता “जा, तुला जे करायचं ते कर” असे ठामपणे सांगणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
त्यांनी उपस्थितांना ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस असतो’ हे विसरू नका, असा सल्ला देत, अशा फ्रॉडला बळी न पडण्याचे मार्ग प्रभावीपणे समजावले.
डॉ. देशपांडे यांचा परिचय:
-
Global Cyber Crime Helpline चे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मार्गदर्शक
-
Digital Hero of the Year पुरस्कार विजेते
-
Cyber Awareness Foundation (महाराष्ट्र राज्य) चे प्रमुख
-
Transcendental-Technologies, Pune University (SPPU) चे मार्गदर्शक
-
Canadian Association for Security and Intelligence Studies – कॅनडा चे सल्लागार
-
Direct Action International – युके चे मेंटर





