Home Breaking News देशी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह सराईत गुन्हेगार भक्तीसिंग दुधानी जेरबंद

देशी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह सराईत गुन्हेगार भक्तीसिंग दुधानी जेरबंद

पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी, पुणे शहर पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीवर कडक कारवाई करत, देशी बनावटीच्या पिस्तुलासह फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. स्वारगेट पोलीस ठाण्याच्या गुन्हे तपास पथकाने ही उल्लेखनीय कारवाई करून परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेला खतपाणी घालणाऱ्या गुंडाला पकडले आहे.

अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव भक्तीसिंग दिपकसिंग दुधानी (Bhaktisingh Deepaksingh Dudhane) असून, तो स्वारगेट परिसरात देशी पिस्तूल कमरेला लावून मोकाटपणे फिरत होता. पोलिसांनी धाडस, संयम आणि अत्युच्च तत्परतेने पाठलाग करून त्याला गुलटेकडीच्या डायसप्लॉट परिसरात अटक केली.

ही कारवाई डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसारख्या महत्वाच्या दिवशी करण्यात आल्यामुळे, ती अधिकच लक्षवेधी ठरली आहे.

सोमवारी (१४ एप्रिल) रात्री जवळपास पावणे बारा वाजता, पोलीस अंमलदार फिरोज शेख व सुजय पवार यांना गुप्त माहिती मिळाली की एक सराईत गुन्हेगार डाईसप्लॉट परिसरात पिस्तूल लावून फिरत आहे. त्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि त्यांच्या आदेशावरून त्यांनी कारवाई सुरू केली.

दुधानी पोलिसांना पाहताच पळून गेला, पण शिताफीने पाठलाग करत त्याला एका गल्लीमध्ये अडवून पकडण्यात आले. अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि पँटच्या खिशात २ जिवंत काडतुसे आढळून आली. हा संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

 या गुन्हेगारावर याआधीही गुन्हे दाखल असून, तो परिसरात गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय होता. त्याच्यावर आता भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह-आयुक्त रंजन कुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त प्रविण कुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

🔸 वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे
🔸 सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर
🔸 उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे
🔸 हवालदार मोराळे, शिंदे
🔸 अंमलदार पवार, खेंदाड, शेख, चव्हाण, दुधे, घुले, टोणपे

या सर्व अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी परिश्रमपूर्वक ही कारवाई पूर्ण केली.