Home Breaking News जय गायकवाडला पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातून तडीपार; कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा मोठा...

जय गायकवाडला पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातून तडीपार; कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा मोठा निर्णय

खराडी (पुणे) — पुणे शहरातील गुन्हेगारीवर कडक लगाम घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुन्हा एकदा ठोस पाऊल उचलले आहे. खराडी पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी जय गौरव गायकवाड (वय २०), रा. दिनकर पठारे वस्ती, लेन नं. २, पप्पु शिंदे यांचे घरासमोर, खराडी, पुणे याला तडीपार करण्यात आले आहे.

या आरोपीविरुद्ध विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्याच्या हालचालींमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. गुन्हेगारी प्रवृत्तीला रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी मुंबई पोलीस अ‍ॅक्ट कलम ५६ (१) (अ) (ब) अंतर्गत कठोर कारवाई करत, त्याला पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे.

ही तडीपार कारवाई दिनांक ०४ एप्रिल २०२५ रोजी मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४, पुणे शहर यांनी आदेशित केली होती. सदर आरोपीस खराडी पोलीसांनी शोधून काढले आणि त्याच्यावर आदेशाची अंमलबजावणी केली.

या कारवाईमध्ये मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४, श्री. हिंमत जाधव, मा. सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग, श्रीमती प्रांजली सोनवणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पोलीस स्टेशन), श्री. संजय चव्हाण (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस स्टेशन), श्रीमती सीमा ढाकणे (अतिरिक्त कार्यभार) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

तसेच, सहायक पोलीस निरीक्षक सिध्दनाथ खांडेकर, पोलीस उप-निरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार शिर्के आणि सांगळे यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.

खराडी परिसरात पुन्हा एकदा कायद्याचा वचक निर्माण झाला असून, या कारवाईबद्दल नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.

या कारवाईचा उद्देश म्हणजे परिसरातील गुन्हेगारी रोखणे, सामान्य जनतेचा आत्मविश्वास वाढवणे आणि कायदा सुव्यवस्था टिकवणे होय.