पुणे: घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून तो लहान-मोठ्या आणि कमर्शियल सिलेंडरमध्ये भरून अवैध व्यवसाय करणाऱ्या इसमाला लोणी काळभोर पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २.१३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कारवाईचा थरारक तपशील
दि. १२ मार्च २०२५ रोजी युनिट ६ गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण व त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, महादेव मंदिराजवळ, लोणी काळभोर येथे एक इसम घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस काढून तो लहान-मोठ्या व कमर्शियल गॅस सिलेंडरमध्ये भरत आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली असता, मदन माधव बामणे (वय २०, रा. महादेव मंदिराजवळ, लोणी काळभोर, पुणे) हा तरुण अवैधपणे गॅस ट्रान्सफर करताना आढळून आला.
मुद्देमालाचा मोठा साठा
सदर ठिकाणी पोलिसांनी विविध कंपनीचे १३५ लहान-मोठे आणि कमर्शियल गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक वजन काटा, गॅस भरण्यासाठी लागणारे पाईप व नोजल असा एकूण २.१३ लाख ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
आरोपीविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम २८७, २८८ सह जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाची उल्लेखनीय कामगिरी
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे २) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, अनिल जाधव, तसेच पोलीस अंमलदारांचे पथक यांनी केली.