पुणे: पुणे शहरात वाढत्या बुलेट मॉडिफाय सायलेन्सरच्या कर्कश आवाजावर अखेर कठोर कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहर वाहतूक शाखेकडून ‘बुलेट सायलेन्सर विशेष मोहीम’ राबवून तब्बल 1768 मॉडिफाय सायलेन्सर जप्त करण्यात आले असून त्यावर रोड रोलर फिरवून नष्ट करण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार, सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा आणि अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) श्री. मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
कशामुळे उचलला कठोर पाऊल?
शहरात अनेक ठिकाणी तरुणांमध्ये बुलेट मोटारसायकलींमध्ये मॉडिफाय सायलेन्सर बसवून सार्वजनिक रस्त्यांवर आणि रहिवासी भागांमध्ये कर्कश आवाज करत गाडी चालवण्याचे प्रकार वाढले होते. दिवसा किंवा रात्री भरधाव वेगाने बुलेट चालवत तरुण गर्दीचे लक्ष वेधून घेत होते.
या कर्कश आवाजामुळे जेष्ठ नागरिक, महिला आणि शांतताप्रिय नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत पुणे पोलिसांकडे वारंवार तक्रारी येत होत्या.
अशी राबवली मोहीम
👉 पुणे वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी विशेष कारवाई करून एकूण 1768 मॉडिफाय सायलेन्सर जप्त केले. 👉 हे सर्व सायलेन्सर एका ठिकाणी गोळा करून त्यावर रोड रोलर फिरवून नष्ट करण्यात आले. 👉 ही कठोर कारवाई पुणेकरांमध्ये चर्चेचा विषय ठरली असून, नागरिकांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
सायलेन्सर विक्रेत्यांवरही कारवाईचा बडगा
वाहतूक शाखेने जाहीर केले की, सायलेन्सर विक्री करणाऱ्या आणि गॅरेजमधून बेकायदेशीर मॉडिफिकेशन करणाऱ्या व्यावसायिकांवरही लवकरच कठोर कारवाई केली जाणार आहे.
पोलीस प्रशासनाचे आवाहन
पोलीस उपआयुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले की, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. पुणेकर नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.