Home Breaking News ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा: पुणे पोलीस दलाचा अभिमानास्पद सहभाग

७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा: पुणे पोलीस दलाचा अभिमानास्पद सहभाग

72
0
पुणे संपूर्ण देशभरात ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला, त्याचप्रमाणे पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथेही या दिनाचा थाटमाटाने उत्सव साजरा झाला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी ९.१५ वाजता ध्वजवंदन करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, निमंत्रित मान्यवर आणि पोलीस दलाचे अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रपती पदक वितरणाचा सोहळा
कार्यक्रमाचा आणखी एक विशेष भाग म्हणजे गुणवत्तापूर्ण आणि उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या सुधार पदकांचा वितरण समारंभ. येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात आले. या गौरवाने कारागृह विभागाच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला.
परेड संचलनाचा थरार
प्रजासत्ताक दिनाच्या परेड संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. परेडचे नेतृत्व उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी केले, तर राखीव पोलीस निरीक्षक दशरथ हाटकर हे सेकंड इन कमांडर म्हणून सहभागी झाले. राज्य राखीव पोलीस बल, पुणे शहर व ग्रामीण पोलीस दल, वाहतूक नियंत्रण शाखा, गृहरक्षक दल, वन विभाग, शाळांचे विद्यार्थी, करागृह विभाग, आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्लाटून यांनी शिस्तबद्ध संचलन सादर केले. विशेष म्हणजे, गुन्हे शोधक पथकाच्या श्वान पथकाने उपस्थितांची मने जिंकली, तर वाहतूक शाखेच्या मोटारसायकल रायडर पथकाने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
हा सोहळा केवळ पोलीस दलाचा सन्मान नव्हे, तर देशाच्या एकतेचा आणि अखंडतेचा संदेश देणारा होता. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणि देशभक्तिपर गाण्यांनी उपस्थितांच्या मनात देशप्रेमाची भावना जागवली. पुणे शहर व ग्रामीण विभागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलीस दलाने आजच्या दिवशी आपले शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत रूप उभे केले.