लोणी काळभोर पोलीस ठाण्याने पुन्हा एकदा आपली सतर्कता आणि कायद्यावरील दृढ पकड सिद्ध केली आहे. पुणे शहरातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एम.पी.डी.ए. प्रकरणातील फरार आरोपी शुभम संजय धुमाळ (वय २३) याला जेरबंद करण्यात आले आहे. धुमाळ हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी, जबरी चोरी, दुखापत अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे जुलै २०२४ मध्ये त्याला पुणे जिल्ह्याबाहेर तडीपार करण्यात आले होते. मात्र, तडीपार आदेशाचा भंग करत तो पुन्हा लोणी काळभोरच्या हद्दीत येत होता.
पोलीसांचा पाठपुरावा आणि धाडसी कारवाई
शुभम धुमाळ हा तडीपार आदेशाचे उल्लंघन करून सतत लोणी काळभोरच्या परिसरात दिसत असल्याने पोलिसांनी त्याच्यावर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एम.पी.डी.ए. प्रस्ताव सादर करण्यात आला, ज्यास मा. पोलीस आयुक्तांनी मान्यता दिली. मात्र, प्रस्ताव मंजूर होताच शुभम धुमाळ फरार झाला. त्याने मोबाईल आणि इतर सर्व संपर्काचे साधने बंद करून आपले अस्तित्व लपवले.
गुप्त ठिकाणावरून मुसक्या आवळल्या
आरोपीच्या फरार होण्यामुळे पुन्हा गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता होती. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्याने विशेष पथक तयार केले. सतत २४ तास काम करून पोलिसांनी अखेर आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला. अथक प्रयत्नांनंतर, लोणी काळभोर पोलीस पथकाने शुभम धुमाळ याला म्हातोबाची आळंदी येथील डोंगरातील गवळेश्वर मंदिरात पहाटे अटक केली.
१ वर्षासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध
आरोपी शुभम धुमाळ याला एम.पी.डी.ए. प्रस्तावानुसार नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात १ वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेचे उत्तम उदाहरण ठरली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कौतुक
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, तसेच पोलीस अंमलदार सातपुते, शिंदे, देवीकर, नागलोत, वाघमोडे, भोसले, नरसाळे, ढमढेरे, विर, कुदळे, पाटील, शिरगिरे, गाडे, कर्डीले, भोसुरे यांचे महत्त्वाचे योगदान राहिले.