मुंबई: अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कारने भरधाव वेगाने मेट्रोचे काम करणाऱ्या दोन कामगारांना धडक दिल्याची धक्कादायक घटना 28 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री घडली. या अपघातात सम्राटदास जितेंद्रदास या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अभिनेत्री उर्मिला कोठारे, तिचा ड्रायव्हर गजानन पाल आणि कामगार सुजन रविदास गंभीर जखमी झाले होते.
या अपघातानंतर 13 दिवसांनी उर्मिला कोठारेने इन्स्टाग्रामवर पोस्टद्वारे तिच्या चाहत्यांना घटनाक्रमाची माहिती दिली. आपल्या पोस्टमध्ये उर्मिलाने अपघाताबद्दल सविस्तर लिहिले आहे.
घटनाक्रम:
“28 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री 12.45 वाजता माझ्या कारचा गंभीर अपघात झाला. हा अपघात पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ घडला. तिथे मेट्रोचे काम सुरू असून मोठी यंत्रसामग्री, जेसीबी लोडर आणि एक्सकॅव्हेटर पार्क करण्यात आले होते. माझा ड्रायव्हर गाडी चालवत होता, आणि अचानक वळण आल्याने दुर्दैवी अपघात घडला. या घटनेत मी आणि माझा ड्रायव्हर गंभीर जखमी झालो आणि आम्हाला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले,” असे उर्मिलाने सांगितले.

पोस्टद्वारे व्यक्त केलेले आभार:
उर्मिलाने पोस्टमध्ये मुंबई पोलीस आणि घटनास्थळी तत्काळ मदत करणाऱ्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. “मुंबई पोलीस आणि डिलिव्हरी कर्मचारी पवन शिंदे यांचे मनःपूर्वक आभार. त्यांनी आम्हाला वेळीच रुग्णालयात दाखल केले, ज्यामुळे आमचा जीव वाचला. मी आता सुखरूप घरी आहे,” असे उर्मिलाने लिहिले.
अपघातातील मृत्यू आणि जखमींची माहिती:
या अपघातात मेट्रो कामगार सम्राटदास जितेंद्रदास यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच सुजन रविदास जखमी झाला आहे. उर्मिला आणि तिच्या ड्रायव्हरला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर उपचार झाले आहेत.





