पिंपरी चिंचवड: कुंभमेळ्यासाठी भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार विविध माध्यमांतून आर्थिक फसवणूक करत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. बनावट वेबसाईट्स, फेक लिंक, आणि मेसेजच्या माध्यमातून भाविकांना आर्थिक नुकसान पोहोचवले जात आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
फसवणुकीचे प्रकार उघडकीस
- बनावट वेबसाईट्स: कुंभमेळ्यासाठी देणगी गोळा करण्याच्या नावाखाली बनावट वेबसाईट्स तयार करून नागरिकांना फसवले जाते.
- ऑनलाइन बुकिंगद्वारे लूट: निवास व्यवस्था, दर्शन पास यासाठी बनावट बुकिंग पोर्टल्सचा वापर करून आर्थिक लूट केली जाते.
- गोपनीय माहितीची चोरी: भाविकांकडून बँक खात्यांची माहिती, पासवर्ड इत्यादी गोपनीय माहिती मागून त्याचा गैरवापर केला जातो.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
- फेक लिंक टाळा: कुंभमेळ्यासाठी प्राप्त अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
- अधिकृत वेबसाइट वापरा: कुंभमेळ्यासाठी अधिकृत माहितीसाठी https://kumbh.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
- गोपनीयता राखा: बँक खाते क्रमांक, पासवर्ड किंवा इतर संवेदनशील माहिती कोणालाही शेअर करू नका.
- फसवणुकीची माहिती द्या: संशयास्पद प्रकार आढळल्यास सायबर हेल्पलाइन cybercrime.gov.in किंवा 1930 वर संपर्क साधा.
पोलिसांचे आवाहन आणि जनजागृती
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कुंभमेळ्याच्या नावाने होणाऱ्या फसवणुकीबाबत जनजागृतीसाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.






