कोल्हापूर, २२ ऑगस्ट: बदलापूरनंतर आता कोल्हापूर हादरले आहे. शिये गावातील रामनगर परिसरात १० वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी दुपारपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह आज पोलिसांनी शिये येथील उसाच्या शेतात सापडला. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मूळची बिहारची असून ती आपल्या आई-वडील आणि पाच भावंडांसोबत रामनगर भागात राहत होती. मुलीचे आई-वडील शिरोली एमआयडीसी मधील एका कारखान्यात मजूर म्हणून काम करतात. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पालकांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली होती.
पोलिसांनी डॉग स्कॉडच्या सहाय्याने शोध घेतला असता, शिये पासून काही अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात मुलीचा मृतदेह आढळला. मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून, वैद्यकीय अहवाल आल्यानंतर अधिक माहिती मिळेल असे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, या धक्कादायक घटनेने संपूर्ण कोल्हापुरात खळबळ उडाली आहे, विशेषत: महायुतीच्या ‘आज लाडकी बहीण’ कार्यक्रमाच्या दरम्यान ही घटना उघडकीस आल्याने राज्यातील मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.






