पुणे: पुणे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलिस ठाण्यांना गुन्हेगारी प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर 7 ऑगस्ट 2024 रोजी खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलिस हवालदार हर्षल दुडम यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, गुन्हेगारी नोंद असलेला आरोपी शुभम शिंदे गावठी पिस्तूल घेऊन सात लव्ह चौक, पुणे येथे थांबलेला आहे.
ही माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे यांना कळवण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) शर्मिला सुतार यांना माहिती देण्यात आली आणि त्यांनी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. तपास पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगले, पोलिस हवालदार हर्षल दुडम आणि अन्य पोलिस कर्मचारी खाजगी वाहन पार्क करून पायी जाऊन सापळा रचला.
सात लव्ह चौकाजवळ पुलाखाली शिंदे आणि त्याचा साथीदार उभा असल्याचे आढळले. पोलिसांना पाहताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु त्यांना काही अंतरावर पकडण्यात आले. एका आरोपीने आपले नाव शुभम अनिल शिंदे (वय 24, निवासी दुर्गा माता मंदिराजवळ, महार्षीनगर, पुणे) असे सांगितले, तर दुसऱ्याने आपले नाव सिद्धेश अशोक शिगवण (वय 19, निवासी श्रीधर काळे सायकल मार्टजवळ, वाहन डेपो, गुलटेकडी, पुणे) असे सांगितले.
त्यांच्याकडून दोन गावठी लोखंडी पिस्तूल, प्रत्येकाची किंमत 55,000 रुपये, आणि 3 राउंड गोळ्या, किंमत 3,000 रुपये असे मिळून एकूण 1,13,000 रुपयांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त (पश्चिम विभाग) प्रवीण पाटील, उपायुक्त (परिमंडळ 1) संदीप सिंग गिल, आणि सहायक पोलिस आयुक्त (फरासखाना विभाग) नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलिस निरीक्षक (गुन्हे) शर्मिला सुतार, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगले आणि अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.