Home Breaking News वयोवृद्धांना फसवणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; पोलिसांनी ८ गुन्ह्यांचा छडा लावत ८.६८ लाखांचा...

वयोवृद्धांना फसवणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; पोलिसांनी ८ गुन्ह्यांचा छडा लावत ८.६८ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत

137
0

पुणे : पोलीस असल्याचे भासवून व वयोवृद्ध नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने अचूक सापळा रचून अटक केली आहे. आरोपी हमीद अफसर खान (वय ३०, रा. पठारे वस्ती, लोणीकाळभोर, पुणे) याने हातचलाखीने विविध परिसरांत वृद्ध नागरिकांची दागिन्यांची लुबाडणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

गुन्हे शाखा युनिट ६ चे अंमलदार पो.हवा. नितीन मुंढे आणि पो.हवा. कानिफनाथ कारखेले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हा कारवाईचा धडाका रचण्यात आला. लोणीकाळभोर स्मशानभूमीजवळून आरोपीला सकाळी ११ वाजता मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले. विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत आरोपीने पुणे शहर व आजूबाजूच्या परिसरात पोलीस असल्याचे सांगून वयोवृद्ध महिलांना गंडा घातल्याची कबुली दिली आहे.

 उघडकीस आलेले गंभीर गुन्हे:

पोलिसांनी केलेल्या तपासणीत आरोपीवर कोंढवा, पर्वती, सिंहगड रोड, कोथरूड, भारती विद्यापीठ, सासवड आदी पोलीस ठाण्यांत एकूण ८ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
यामध्ये भादंवि कलम ४२० (फसवणूक), ३१६ (२), ३१८(४), १७० (खोट्या पदाचा वापर) इत्यादी गंभीर कलमांचा समावेश आहे.

 

 हस्तगत मुद्देमाल:

  • ९६ ग्रॅम सोन्याचे दागिने – किंमत अंदाजे ₹७,६८,०००/-

  • टीव्हीएस अपाचे RTR 200 मोटारसायकल – अंदाजे किंमत ₹१,००,०००/-

एकूण हस्तगत मुद्देमाल – ₹८,६८,०००/-

या कारवाईत आरोपीकडून लुटलेल्या मालमत्तेची पुनर्प्राप्ती करण्यात पोलिसांना मोठे यश आले असून, त्यामुळे अनेक वयोवृद्धांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

यशस्वी कारवाईमागील अधिकारी व कर्मचारी:

या उत्कृष्ट कामगिरीबाबत मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, मा. सह. पोलीस आयुक्त (गुन्हे २) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

प्रभारी पो.नि. वाहीद पठाण, स.पो.नि. मदन कांबळे, पो.उप.नि. रामकृष्ण दळवी, आणि त्यांच्यासोबत असलेले पोलीस कर्मचारी – नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, बाळासाहेब तनपुरे, गणेश डोंगरे, नितीन धाडगे, शेखर काटे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती नरवडे – यांनी उत्कृष्ट कार्यगिरी बजावली.