मुंबईतील वरळी सीफेसवर शनिवारी (१९ एप्रिल) एका महिलेवर झालेल्या हल्ल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ हातातील छत्री चुकून अंगाला लागल्याने ३५ वर्षीय व्यक्तीने काचेचा तुकडा महिलेच्या पाठीत खुपसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
दुपारी दीड वाजताच्या सुमारास अनिता बाळू पाटकर या महिला जे.के. कपूर चौकाजवळून जात असताना, त्यांच्या छत्रीचा स्पर्श एका व्यक्तीला झाला. या किरकोळ कारणावरून संबंधित व्यक्ती, जो की गर्दुल्ला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे, त्याने हातात असलेल्या काचेच्या तुकड्याने महिलेला पाठीत गंभीर जखमी केले.
जखमी महिलेला तात्काळ परळमधील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी महिलेचा मुलगा संदीप पाटकर याने त्वरित वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा माग काढला. फक्त पाच तासांत पोलिसांनी आरोपी सचिन भगवान अवसरमोल (वय ३५, रा. चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर) याला अटक केली.
सदर प्रकारामुळे वरळी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गर्दुल्ल्यांवर योग्य नियंत्रण नसल्यानं असे हल्लेखोर उघडपणे वावरत असल्याची टीका स्थानिकांनी केली आहे.
पुणे-मुंबई महामार्गावर ब्रेक फेल झालेल्या ट्रकने तीन वाहनांना उडवलं; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू!
पुणे-मुंबई महामार्गावर शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास वाघजाई मंदिराजवळ एक भीषण अपघात घडला. मुंबईच्या दिशेने निघालेल्या ट्रकचे ब्रेक अचानक फेल झाले. यामुळे ट्रकने समोरच्या चारचाकी वाहनास जोरदार धडक दिली आणि मग विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन गाड्यांना ठोकरले.
या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत ट्रकला डोंगराच्या दिशेने वळवले, ज्यामुळे आणखी मोठी दुर्घटना टळली.
अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली असून, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू आहे.