Home Breaking News दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या मोका गुन्हेगाराला अखेर चंदननगर पोलिसांची कसून शक्कल;...

दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या मोका गुन्हेगाराला अखेर चंदननगर पोलिसांची कसून शक्कल; निशांत उर्फ मोन्या भालेरावला अटक!

156
0

पुणे:- दोन वर्षांपासून पोलिसांच्या हातात न लागणारा आणि मोका (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल असलेला खतरनाक गुन्हेगार निशांत उर्फ मोन्या भालेराव याला अखेर चंदननगर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरवणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या गेल्या असून स्थानिक नागरिकांमध्ये मोठा दिलासा निर्माण झाला आहे.

 काय होती गुन्ह्याची पार्श्वभूमी?

१० ऑक्टोबर २०२३ रोजी, रात्री १.२५ वाजता वडगावशेरीतील सुमा कॅफे – बुद्धाज चायनीज हॉटेलसमोर, फिर्यादी उभे असताना शुभम भोसले व त्याच्या ४-६ साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शिवीगाळ, धमकी आणि शस्त्र दाखवत दहशत निर्माण केली.

फिर्यादी जीव वाचवण्यासाठी पळाले असता आरोपींनी वसाहतीतील दुचाकी, तिनचाकी व चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्या, मोठमोठ्याने आरडाओरडा करून धारदार शस्त्रं हवेत फिरवून दहशत पसरवली. नागरिक भीतीपोटी घरात लपले. या गंभीर प्रकारानंतर चंदननगर पोलिसांनी गु.र.क्र. 470/2023 अन्वये विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

 फरारी आरोपी निशांत भालेराव – २ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा

या गुन्ह्यातील आरोपी निशांत उर्फ मोन्या रमेश भालेराव (वय २०, रा. वडगावशेरी) मागील दोन वर्षांपासून फरार होता. पोलिसांनी त्याचा शोध सुरुच ठेवला होता, मात्र तो प्रत्येक वेळी हातातून निसटत होता.

पण पोलीस अंमलदार विश्वनाथ गोणे यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून अखेर तो मातोश्री सोसायटीसमोरील नागपाल रोड, खराडी येथे असल्याचे समजले.
त्यावर पोलीस उपनिरीक्षक अजय असवले व त्यांचे पथक घटनास्थळी पोहचले आणि आरोपीने पळण्याचा प्रयत्न केल्यावर त्याचा शिताफीने पाठलाग करून ताबा घेतला.

 पोलिसांची यशस्वी कारवाई

ही संपूर्ण कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व) श्री. मनोज पाटील,
मा. पोलीस उपायुक्त (परिमंडळ ४) श्री. हिम्मत जाधव,
मा. सहा. पोलीस आयुक्त (खडकी) श्रीमती प्रांजली सोनवणे
यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सीमा ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक अजय असवले, पोलीस अंमलदार विश्वनाथ गोणे, रामचंद्र गुरव, विकास कदम, शेखर शिंदे यांचा समावेश होता.

 समाजात शांततेसाठी महत्वाचा निर्णय

या अटकेने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या टोळीच्या मनसुब्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांची तत्परता आणि नियोजनबद्ध पथककारवाईमुळे गुन्हेगारांच्या मनात पोलिसांविषयी भीती निर्माण होईल, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.

 नागरिकांसाठी आवाहन

पोलिसांनी नागरिकांना संशयास्पद व्यक्ती वा हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध पोलिसांनी उचललेल्या पावलांचे कौतुक केले जात आहे.