पुणे: आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) आणि इंडियन ऑईल यांच्या सहकार्याने १९ ते २१ जून दरम्यान येरवडा मध्यवर्ती कारागृहात ‘Chess for Freedom‘ या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी कारागृह विभागाचे अतिरिक्त महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी राज्यातील प्रत्येक कारागृहातून बुद्धिबळ खेळणाऱ्या संघांची निर्मिती करून महिला कैद्यांच्या सहभागावर भर दिला जाईल असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी, कारागृह विभागाचे विशेष पोलीस महासंचालक डॉ. जलिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, येरवडा जेल अधीक्षक सुनील धामल, इंडियन ऑईलचे संचालक (मानव संसाधन) रश्मी गोविल, फिडे सोशल कमिशनचे अध्यक्ष आंद्रे वोगेटलिन, अखिल भारतीय बुद्धिबळ संघाचे अध्यक्ष नितीन नारंग आणि फिडेचे अधिकृत अधिकारी उपस्थित होते. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी विदेशी प्रतिनिधींचेही शिष्टमंडळ उपस्थित होते.
‘परिवर्तन प्रिझन टू प्राईड-नई दिशा’ या उपक्रमांतर्गत येरवडा जेलच्या कैद्यांच्या संघाने आंतरराष्ट्रीय ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल आनंद व्यक्त करताना गुप्ता म्हणाले, जेलमधील कैदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढे येत आहेत. सुवर्णपदक विजेत्या कैद्यांना त्यांच्या शिक्षेत विशेष सूट देऊन प्रोत्साहित करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी येरवडा जेलमध्ये कैद्यांसाठी बुद्धिबळ खेळ सुरू केल्यानंतर एका वर्षाच्या आतच ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. कैद्यांनी चांगली तयारी करून गेल्या वर्षी सुवर्णपदक जिंकले आहे. या कारागृहातील खेळाडूंनी बाहेर सर्व सुविधा असणाऱ्या खेळाडूंना जे साध्य करता आले नाही ते करून दाखवले आहे. सध्या येरवडा जेलमध्ये २०० पुरुष आणि महिला कैदी बुद्धिबळ शिकत आहेत, असे गुप्ता म्हणाले.
या प्रसंगी गोविल म्हणाल्या, बुद्धिबळ बुद्धिमत्तेला उत्तेजन देतो आणि परिस्थितीचा यशस्वीपणे सामना करण्याची कौशल्ये विकसित करतो. त्यामुळे कैद्यांना भविष्यात याचा फायदा होईल.
या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट कैद्यांना बुद्धिबळ खेळात प्रशिक्षण देऊन विविध देशांतील कैद्यांसाठी स्पर्धा आयोजित करणे आहे. उद्घाटनप्रसंगी असे सांगण्यात आले की, या माध्यमातून कैदी कारागृहातून सुटल्यानंतर समाजात जाऊन स्वाभिमानाने जगण्यासाठी आत्मविश्वास मिळवू शकतील.






