पुणे : पुणे शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या धक्कादायक गोळीबार प्रकरणातील आरोपींना पुणे पोलिसांनी शिताफीने अटक करत मोठे यश मिळवले आहे. मार्केटयार्ड पोलीस स्टेशन आणि खंडणी विरोधी पथक-१ यांच्या संयुक्त कारवाईत या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपींसह एकूण पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील मिनाताई ठाकरे वसाहत येथे राहणाऱ्या काही सराईत गुन्हेगारांचा मोझेस मल्लिकार्जुन शेकापुरे यांच्याशी पूर्वीपासून वाद होता. या वादातूनच दिनांक ०६ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ११.२० ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली.
त्या रात्री मोझेस शेकापुरे, त्यांचा भाऊ आणि मित्र हे महर्षीनगर परिसरात शिवजयंती उत्सव पाहून दुचाकीवरून कोंढवा येथील घरी परतत होते. त्यावेळी काही आरोपींनी त्यांचा पाठलाग करत वखार महामंडळ चौक ते गंगाधाम चौक रोडवरील बन्सीलाल नेमीचंद ओस्तवाल यांच्या दुकानासमोर त्यांना अडवले आणि पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. या गोळीबारात मोझेस शेकापुरे जखमी झाले आणि आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
या घटनेनंतर मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ३१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच आर्म अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले. त्यानंतर विशेष तपास पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून माहिती गोळा केली.
या तपासातून पोलिसांनी सापळा रचून आरोपी राजू उमाप (वय ५५), शुभम दिलीप पवार (वय २०) आणि आनंद उमाप (वय २२) यांना ताब्यात घेतले. चौकशीतून आणखी काही आरोपींचा सहभाग समोर आला आणि त्यानंतर तपास अधिक वेगाने पुढे नेण्यात आला. दरम्यान, खंडणी विरोधी पथक-१ चे पोलीस कर्मचारी तपास करत असताना पोलीस अंमलदार मयुर भोकरे यांना गोपनीय माहिती मिळाली की, या गोळीबारातील उर्वरित आरोपी नांदेड सिटी गेटजवळ जोगेश्वरी विसर परिसरात लपून बसले आहेत आणि त्यांच्याकडे पिस्तूल असून ते पोलिसांवर गोळीबार करण्याची शक्यता आहे.
या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी त्या परिसरात चारही बाजूंनी घेराव घालून छापा टाकला. पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे आरोपींना पळून जाण्याची संधी मिळाली नाही. या कारवाईत बालाजी उमाप (वय २२, रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) आणि साहिल चव्हाण (वय २०) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून विदेशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
या संपूर्ण कारवाईमुळे पुण्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश झाला असून शहरात घडलेल्या गंभीर गुन्ह्याचा छडा पोलिसांनी लावला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपींविरुद्ध पुढील तपास सुरू असून या टोळीचा इतर गुन्ह्यांमध्येही सहभाग असण्याची शक्यता तपासली जात आहे. सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-२) मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवार आणि शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप, पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिता नवले यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरीक्षक सुधीर कटारे, सिद्धनाथ खांडेकर, अश्विनी कट्टे, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, सुनील भापकर तसेच पोलीस कर्मचारी थोरात, कौस्तुभ जाधव, राऊत, किरण जाधव, जेधे, प्रविण तायडे, अमरनाथ लोणकर, संदीप सुर्यवंशी आणि खंडणी विरोधी पथक-१ मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई केली. पुणे पोलिसांच्या या धाडसी आणि जलद कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीवर मोठा आळा बसण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांनी मत व्यक्त केले आहे.