Home Breaking News कोंढव्यातील स्पा सेंटरवर पुणे पोलिसांचा छापा; वेश्याव्यवसायातून ४ महिलांची सुटका, स्पा मॅनेजर...

कोंढव्यातील स्पा सेंटरवर पुणे पोलिसांचा छापा; वेश्याव्यवसायातून ४ महिलांची सुटका, स्पा मॅनेजर महिलेला अटक

पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसरात स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत ४ पीडित महिलांची सुटका केली असून एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांच्या पथकाने केली.
दि. ०७ मार्च २०२६ रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, कोंढवा येथील एन.आय.बी.एम. रोडवरील सनश्री वुड्स कमर्शियल प्रिमायसेस बिल्डिंगमध्ये असलेल्या “ओपल स्पा अॅण्ड सलून” या ठिकाणी स्पा मसाज सेंटरच्या आडून महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी तातडीने गुप्त पद्धतीने तपास सुरू केला.
पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून माहितीची खात्री केली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने अचानक छापा टाकत स्पा सेंटरमध्ये सुरू असलेला अवैध प्रकार उघडकीस आणला. या कारवाईत वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या ४ महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी टी. झुंचुमबीनी थम्फीयोलोथा खितान (वय ३२) या महिला स्पा मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. ती सध्या कोंढवा परिसरातील शिवनेरीनगर येथे वास्तव्यास असून तिचा मूळ पत्ता नागालँड राज्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच या प्रकरणात एक पुरुष आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक १५९/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत कलम ३, ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, शहरात स्पा, मसाज सेंटर किंवा ब्युटी पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा अवैध व्यवसायांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. अशा प्रकारच्या माहिती नागरिकांनी पोलिसांना दिल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल.
सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे व सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस कर्मचारी दत्ताराम जाधव, बबनराव केदार, भुजबळ, अविनाश कोंडे तसेच महिला पोलीस कर्मचारी खेडेकर यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला. पुणे पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे परिसरातील अवैध वेश्याव्यवसायाला मोठा आळा बसला असून नागरिकांकडून पोलिसांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.