Home Breaking News बनावट सोन्याच्या बिस्किटांचा आमिष दाखवून फसवणूक करणारा अट्टल आरोपी पुणे गुन्हे शाखेच्या...

बनावट सोन्याच्या बिस्किटांचा आमिष दाखवून फसवणूक करणारा अट्टल आरोपी पुणे गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे शहरात बनावट सोन्याच्या बिस्किटांचा वापर करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक क्रमांक २ ने अटक केली आहे. आरोपीकडून मोठ्या प्रमाणात बनावट सोन्याची बिस्कीटे, बेनटेक्स चेन तसेच लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अशा प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी विविध ठिकाणी गस्त घालत होते. दरम्यान, पोलीस अंमलदार नितीन मुंढे आणि कानिफनाथ कारखिले हे हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील भाजी मंडई परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार रेकॉर्डवरील आरोपी दिलीप विश्वनाथ स्वामी उर्फ जाधव (वय ५२ वर्षे, रा. जळकोट, जि. लातूर) हा आपल्या साथीदारासह साधना विद्यालयाकडे जाणाऱ्या कॅनल रोड परिसरात संशयास्पद हालचाली करत असून चोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती तात्काळ खंडणी विरोधी पथक क्रमांक २ चे पोलीस निरीक्षक राम राजमाने यांना देण्यात आली.
पोलीस निरीक्षक राम राजमाने यांनी माहितीची खातरजमा करून तातडीने योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गौरव देव यांच्या नेतृत्वाखाली पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी परिसरात शोध घेतला असता रेकॉर्डवरील आरोपी दिलीप स्वामी हा संशयास्पद अवस्थेत आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने अनेक धक्कादायक गुन्ह्यांची कबुली दिली.
चौकशीदरम्यान आरोपीने दिनांक २४ जुलै २०२५ रोजी सकाळी सुमारे ११.१५ वाजता प्रेमळ विठ्ठल मंदिर परिसरातील फुटपाथवर वयोवृद्ध महिलांना जेवण वाटपाच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेत एका महिलेला फसवले असल्याचे सांगितले. त्या महिलेला गर्दी असल्याने गळ्यातील सोन्याची पोत सुरक्षित ठेवण्यासाठी पिशवीत ठेवण्याचा सल्ला देत आरोपीने ती पिशवी फसवणुकीने घेऊन पळ काढला होता. या प्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक १४८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशातून सोन्यासारखी दिसणारी दोन बनावट पिवळ्या धातूची बिस्कीटे तसेच एक बेनटेक्स चेन मिळून आली. ही बिस्कीटे वापरून आरोपी लोकांना खरे सोने असल्याचा भास निर्माण करत त्यांची फसवणूक करत असल्याचे उघड झाले. तसेच आरोपीने आपल्या साथीदारासह इरटीगा कारमधून कराड, जि. सातारा येथे प्रवास करून तेथील एका वयोवृद्ध महिलेला बनावट सोन्याची बिस्कीटे दाखवून तिच्या गळ्यातील मणी-मंगळसूत्र काढून घेतल्याची कबुली दिली आहे. या संदर्भात कराड सिटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक २५८/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी आरोपीचा गुन्हेगारी इतिहास तपासला असता तो रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अपहरण, अत्याचार (अॅट्रॉसिटी) तसेच फसवणूक यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. या कारवाईदरम्यान आरोपीकडून सुमारे १२ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पुढील तपासादरम्यान आरोपीचे इतर साथीदार, त्याचे नेटवर्क आणि अशा प्रकारे केलेल्या इतर गुन्ह्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. खंडणी विरोधी पथक २ चे पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव तसेच पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले, चेतन आपटे, विनोद महाजन, गणेश खरात आणि आझाद पाटील यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली. पुणे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अनोळखी व्यक्तींकडून सोन्याची बिस्कीटे, दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तू स्वस्तात देण्याचे आमिष दाखवले जात असल्यास त्यावर विश्वास ठेवू नये आणि त्वरित पोलिसांना माहिती द्यावी.