पुणे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई करत एका युवकाला देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूसासह अटक केली आहे. ही कारवाई येरवडा परिसरातील डेक्कन कॉलेजच्या मैदानाजवळ करण्यात आली असून पोलिसांनी सापळा रचून संशयिताला पकडण्यात यश मिळवले.
लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन हद्दीत नियमित पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार अमोल गायकवाड व कादिर शेख यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक संशयित व्यक्ती डेक्कन कॉलेजच्या मैदानाजवळील मोकळ्या जागेत थांबलेला आहे. त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळी ट्रॅक पॅन्ट घातली असून त्याच्याकडे देशी बनावटीचे अग्निशस्त्र असल्याची माहिती मिळाली.
मिळालेली माहिती त्यांनी तात्काळ तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार यांना दिली. त्यानंतर ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र मानसिंग कदम यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. वरिष्ठांच्या आदेशानुसार लगेचच पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन परिसराची पाहणी केली आणि संशयित व्यक्तीवर नजर ठेवून सापळा रचला. सदर वर्णनाशी मिळतीजुळती व्यक्ती कोणाची तरी वाट पाहत उभी असल्याचे पोलिसांना दिसून आले. योग्य वेळ साधून पोलीस पथकाने त्या व्यक्तीस ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव सोनू सिंग दिपकसिंग बावरी (वय २२ वर्षे), रा. सर्व्हे नं. १०, पोते वस्ती, मांगीरबाबा मंदिराशेजारी, येरवडा, पुणे असे सांगितले.
पोलिसांनी पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस आढळून आले. त्यामुळे आरोपीविरुद्ध लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक १४७/२०२६ दाखल करण्यात आला असून त्याच्यावर आर्म अॅक्ट कलम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार आरोपी कोणत्या कारणासाठी त्या ठिकाणी थांबला होता आणि त्याने हे शस्त्र कोणाकडून मिळवले याचा शोध घेतला जात आहे. तसेच या प्रकरणामागे इतर कोणी सहभागी आहे का याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४ चुलूमूला रजनिकांत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र मानसिंग कदम यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार तसेच पोलीस अंमलदार अमोल गायकवाड, कादिर शेख, कांबळे, अक्षय शिंदे, राहुल परदेशी, अतुल जाधव आणि सुरज ओंबासे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली. पुणे शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून सातत्याने कठोर कारवाई केली जात असून नागरिकांनी संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.