पुणे : पुणे शहरात बेकायदेशीररित्या गर्भलिंगनिदान करणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेच्या युनिट-७ने मोठा पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या धाडीत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय साहित्य आणि औषधे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गर्भलिंगनिदानासंदर्भात गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला. डमी महिला रुग्ण आणि तिच्या पतीच्या माध्यमातून कारेगाव, रांजणगाव एमआयडीसी परिसरातील लाईफ केअर क्लिनिक येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान आरोपी आकाश सुभाष मलगुंडे (वय ३५, रा. ढोकसांगवी, ता. शिरूर) हा मोबाईल अॅप आणि छोट्या सोनोग्राफी प्रोबच्या साहाय्याने डमी महिला रुग्णाचे बेकायदेशीर सोनोग्राफी करताना रंगेहाथ सापडला.
या प्रकरणात एजंट म्हणून काम करणारा नरेंद्र साहेबराव ठाकरे (वय ५२, रा. केसनंद, ता. हवेली) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. क्लिनिक आणि आरोपीच्या वाहनाची तपासणी केली असता गर्भलिंगनिदानासाठी वापरले जाणारे उपकरण, मोबाईल प्रणाली तसेच गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधे आढळून आली. सरकारी पंच, जिल्हा शल्य चिकित्सक आणि स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून एकूण ७ लाख ७३ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. समाजात अजूनही अस्तित्वात असलेल्या गर्भलिंगनिदानासारख्या बेकायदेशीर प्रथांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त Amitesh Kumar, सह पोलीस आयुक्त Ranjankumar Sharma, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) Pankaj Deshmukh, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) Nikhil Pingale आणि सहाय्यक पोलीस आयुक्त Rajendra Mulik यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. युनिट-७चे पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडक कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे बेकायदेशीर गर्भलिंगनिदानाच्या विरोधात मोठा संदेश गेला असून समाजात मुलगा-मुलगी भेदभावाच्या विरोधात कायद्याची अंमलबजावणी अधिक कठोरपणे होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.