Home Breaking News आठ महिन्यांपासून फरार घरफोडीचा आरोपी अखेर जेरबंद; पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-४ची कारवाई

आठ महिन्यांपासून फरार घरफोडीचा आरोपी अखेर जेरबंद; पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-४ची कारवाई

44
0
पुणे : शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यात आठ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-४च्या पथकाने अटक करण्यात यश मिळवले आहे. आरोपी पार्थ ऊर्फ सागर ज्ञानेश्वर भांडे (वय ३१, रा. घोरपडी पेठ, पुणे) याला येरवडा मेट्रो स्टेशन परिसरातून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गा निवास अपार्टमेंट, नानापेठ येथे काही महिन्यांपूर्वी घरफोडीची घटना घडली होती. या प्रकरणात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यानंतर आरोपी फरार झाला होता. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असताना गुन्हे शाखेच्या युनिट-४ पथकाला गोपनीय माहिती मिळाली की संबंधित आरोपी येरवडा मेट्रो स्टेशन परिसरात येणार आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचून संशयित इसमाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव पार्थ ऊर्फ सागर ज्ञानेश्वर भांडे असे सांगितले. पुढील तपासात त्याने नानापेठ येथील घरफोडीच्या गुन्ह्यात आपला सहभाग असल्याची कबुली दिली. पोलिसांनी तत्काळ समर्थ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती पडताळून पाहिली असता गु.र.नं. १४३/२०२५ अंतर्गत तो वाँटेड आरोपी असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी समर्थ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यांवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ही कारवाई पुणे शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त Nikhil Pingale आणि सहाय्यक पोलीस आयुक्त Rajendra Mulik यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक Kanchan Jadhav यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, सहायक पोलीस उपनिरीक्षक एकनाथ जोशी तसेच पोलीस अंमलदार जहांगिर पठाण, विशाल इथापे, नागेशसिंग कुंवर, प्रविण भालचिम, विठ्ठल वाव्हळ आणि महिला पोलीस अंमलदार रोहिणी पांढरकर यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडली. पुणे पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली असून अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.