Home Breaking News पुणे–सोलापूर महामार्गावर भव्य स्वच्छता मोहीम; सुमारे १.५ टन कचरा संकलन

पुणे–सोलापूर महामार्गावर भव्य स्वच्छता मोहीम; सुमारे १.५ टन कचरा संकलन

40
0
पुणे शहर आणि उपनगर परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने आदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह, इंदिरा एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग कॉलेज, जनवाणी संस्था, स्वच्छ संस्था आणि ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे–सोलापूर महामार्गावर भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. बुधवार, सकाळी १०.३० ते १२.०० या वेळेत ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र ते मोरे वस्ती राम मंदिर, रोहित वडेवाले साईट या पट्ट्यात ही मोहीम पार पडली.
या अभियानाला पुणे महानगरपालिकेचे मा. सभासद श्री. अजित आबा घुले, मा. सभासद श्री. डॉ. दादा कोद्रे, मा. सभासद सौ. सारिका अमित घुले आणि मा. सभासद सौ. नंदाताई आबनावे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. स्थानिक नागरिक, स्वयंसेवक, विद्यार्थी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या उत्साहाने या मोहिमेत सहभागी झाले.
स्वच्छता मोहिमेदरम्यान रस्त्याच्या कडेला साचलेला प्लास्टिक कचरा, थर्माकोल, कागद, काचेच्या बाटल्या तसेच इतर घनकचरा वेगळा करून संकलित करण्यात आला. एकूण सुमारे १.५ टन कचरा गोळा करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. संकलित कचऱ्याचे वर्गीकरण करून पुनर्वापरयोग्य व जैविक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ कचरा उचलणे नसून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. महामार्ग परिसरात वाढत्या प्रमाणात फेकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे पर्यावरण व सार्वजनिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता नियमित स्वच्छता मोहिमा राबविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन ‘स्वच्छ रस्ता, सुंदर शहर’, ‘कचरा डब्यातच टाका’ असे संदेश देत जनजागृती केली.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे नमूद केले. अशा उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकीची जाणीव दृढ होते आणि पर्यावरण संरक्षणाला चालना मिळते, असे त्यांनी सांगितले. भविष्यातही विविध भागांमध्ये अशा स्वच्छता मोहिमा आयोजित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
या अभियानामुळे पुणे–सोलापूर महामार्गाचा परिसर स्वच्छ व सुटसुटीत दिसू लागला असून स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ या संकल्पनेला बळकटी देणारा हा उपक्रम ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.