पुणे : Pune Police च्या गुन्हे शाखेअंतर्गत कार्यरत खंडणी विरोधी पथक-२ ने मोक्का गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक करून मोठी कारवाई केली आहे. शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेअंतर्गत ही यशस्वी कारवाई करण्यात आली.
मा. वरिष्ठांच्या आदेशानुसार पथकातील अधिकारी व अंमलदार हे पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत होते. तसेच मोक्का गुन्ह्यातील फरारी व पाहिजे आरोपींचा शोध घेण्यासाठी गोपनीय माहिती गोळा करण्याचे काम सुरू होते. यावेळी पोलीस अंमलदार अमोल घावटे व गणेश खरात यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, काळेपडळ पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजि. नं. ४०४/२०२५ व ४००/२०२५ मधील मोक्का अंतर्गत पाहिजे आरोपी जावेद गणी शेख (वय ४२ वर्षे, रा. मंगळवार पेठ, पुणे) हा कोरेगाव पार्क परिसरात येणार आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कोरेगाव पार्क परिसरात सापळा रचला. लेन नंबर २ येथे आरोपी दिसून येताच पोलिसांनी शिताफीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमे तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.
आरोपी हा संघटित गुन्हेगारी टोळीशी संबंधित असून खूनाचा प्रयत्न, मारहाण, धमकी देणे, दहशत निर्माण करणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. त्याच्या अटकेमुळे संबंधित टोळीच्या हालचालींना मोठा धक्का बसला असून पुढील तपासात आणखी धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव तसेच पथकातील अधिकारी व अंमलदारांनी समन्वयाने ही मोहीम यशस्वी केली.
पुणे शहरातील संघटित गुन्हेगारीविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.