Home Breaking News जुहूमध्ये रंगला पहिला पुष्पोत्सव; पद्मश्री अक्षय कुमार यांच्या हस्ते भव्य उद्घाटन

जुहूमध्ये रंगला पहिला पुष्पोत्सव; पद्मश्री अक्षय कुमार यांच्या हस्ते भव्य उद्घाटन

24
0
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने जुहू परिसरातील पुष्पा नरसी उद्यान येथे आयोजित भव्य पुष्पोत्सवाचे आज उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेते आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अक्षय कुमार यांनी उपस्थित राहून पुष्पोत्सवाचे उद्घाटन केले.
या प्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, आमदार अमित साटम, आमदार हारुन खान तसेच अनेक नगरसेवक, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनीही हजेरी लावली.
फुलांची मनमोहक सजावट
पश्चिम उपनगरातील जुहू परिसरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या पुष्पोत्सवात विविध फुलांच्या आरासीतून भारताचा नकाशा, शंकराची पिंड-नंदी, सनई-चौघडे-तुतारी, फुलपाखरू, मोर, हत्ती आणि घोडा अशा आकर्षक कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीमुळे उद्यान परिसर निसर्गसौंदर्याने उजळून निघाला आहे.
 उद्यानप्रेमींसाठी विशेष आकर्षण
या उत्सवात विविध प्रकारची रोपे, शोभेची झाडे, कुंड्या, सेंद्रिय खते, बागकामाची अवजारे आणि नर्सरी स्टॉल्स नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. तसेच फुलांपासून बनवलेली अ‍ॅरोमा थेरपी उत्पादनेही येथे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. पर्यावरण संवर्धन आणि वृक्षलागवडीबाबत जनजागृती करण्यासाठी माहितीपर दालनेही उभारण्यात आली आहेत.

नागरिकांसाठी खुला प्रवेश
हा पुष्पोत्सव १४ फेब्रुवारी ते रविवार १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ८:०० ते रात्री ९:०० वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुला आहे. कुटुंबीयांसह भेट देण्यासाठी हा उत्तम अवसर असून, निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफी प्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देण्यासोबतच मुंबईकरांना निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची सुंदर संधी उपलब्ध झाली आहे.