Home Breaking News सांगलीचा प्रणव देशाच्या पातळीवर झळकला! ‘परीक्षा पे चर्चा 2026’ साठी महाराष्ट्रातून एकमेव...

सांगलीचा प्रणव देशाच्या पातळीवर झळकला! ‘परीक्षा पे चर्चा 2026’ साठी महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थ्याची निवड

सांगली : सांगलीच्या मातीने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली असून महाराष्ट्राच्या लेकराने थेट देशाच्या पातळीवर झेंडा रोवला आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित ‘परीक्षा पे चर्चा 2026’ या उपक्रमासाठी देशभरातून तब्बल 4.5 कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या प्रचंड स्पर्धेतून केवळ 36 विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली असून त्यात महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थी म्हणून सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कळंबी येथील अजितराव घोरपडे विद्यालयाचा दहावीचा विद्यार्थी प्रणव भोसले याने मानाचे स्थान मिळवले आहे.
ग्रामीण भागातील साध्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या प्रणवने आपल्या जिद्द, मेहनत आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर ही मोठी संधी मिळवली आहे. देशाच्या पंतप्रधानांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. प्रणवच्या निवडीमुळे केवळ त्याचे कुटुंब किंवा शाळाच नव्हे, तर संपूर्ण सांगली जिल्हा आणि महाराष्ट्र अभिमानाने भरून गेला आहे.
‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या ताणतणावावर मात करण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी आणि परीक्षेबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी आयोजित केला जातो. या कार्यक्रमात पंतप्रधान स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधतात, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतात आणि प्रेरणादायी अनुभव सांगतात. या राष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी आता प्रणववर आहे.
प्रणवसोबत विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एन. पाटील यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रण मिळाले आहे. शाळेतील शिक्षकांनी प्रणवच्या यशामागे सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध दिनक्रम आणि पालकांचे पाठबळ असल्याचे सांगितले. शाळेत आनंदाचे वातावरण असून शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्याचा सत्कार करून शुभेच्छांचा वर्षाव केला.
प्रणवचे पालक शेतकरी कुटुंबातील असून अत्यंत साध्या परिस्थितीतून त्याने हे यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मोठी स्वप्ने पाहता येतात आणि ती पूर्ण करता येतात, याचे हे जिवंत उदाहरण असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली. प्रणवच्या यशामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असून ‘मेहनत आणि चिकाटी असेल तर काहीच अशक्य नाही’ हा संदेश पुन्हा अधोरेखित झाला आहे.
संपूर्ण गावाने त्याचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या शैक्षणिक परंपरेला आणि ग्रामीण भागातील गुणवत्तेला प्रणवने राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवून दिला आहे.