महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत कठीण आणि भावनिक प्रसंगात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित दादा पवार यांनी घेतलेला निर्णय राज्यहितासाठी महत्त्वाचा असून तो धाडसी आणि कौतुकास्पद आहे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. सुनेत्रा अजित दादा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “प्रसंग अत्यंत कठीण होता. मात्र, ज्या धीरोदात्तपणे आणि परिपक्वतेने श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांनी महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला, तो त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे आणि राज्याबद्दलच्या प्रतिबद्धतेचे प्रतीक आहे.”
अजितदादांचा वारसा समर्थपणे चालवतील
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, “हा शुभेच्छा देण्याचा प्रसंग नाही, तर विश्वास व्यक्त करण्याचा क्षण आहे. दिवंगत अजितदादा पवार यांनी राज्यासाठी पाहिलेले स्वप्न आणि त्यांनी घालून दिलेला वारसा सुनेत्रा अजित दादा पवार समर्थपणे पुढे नेतील, याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे.”
राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्याचा उल्लेख करत फडणवीस यांनी ही कारकिर्द यशस्वी ठरेल, असा आशावाद व्यक्त केला. महिलांच्या नेतृत्वाला नवी दिशा देणारा हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महायुती सरकार कुटुंबाच्या पाठीशी
या भावनिक काळात भाजप आणि महायुती सरकार अजितदादा पवार यांच्या कुटुंबियांच्या ठामपणे पाठीशी उभे आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. “या कठीण प्रसंगी महायुती सरकार म्हणून आम्ही अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत,” असे त्यांनी ठाम शब्दांत सांगितले.
सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याला स्थैर्य, संवेदनशीलता आणि विकासाभिमुख कारभार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात सकारात्मक संदेश गेला आहे.