Home Breaking News साश्रू नयनांनी महाराष्ट्राने दिला अजितदादांना अखेरचा निरोप; बारामतीत शोकसागर उसळला

साश्रू नयनांनी महाराष्ट्राने दिला अजितदादांना अखेरचा निरोप; बारामतीत शोकसागर उसळला

46
0
बारामती | प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणातील धगधगता झंझावात, जनतेच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांना आज बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडलेल्या या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित प्रत्येकाचे मन गहिवरून आले होते.
अजितदादांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येताच परिसरात एकच शांतता पसरली. परवा सायंकाळपर्यंत ज्यांच्यासोबत बैठका, चर्चा, निर्णय प्रक्रिया सुरू होत्या, तेच अजितदादा आज आपल्यात नाहीत, ही भावना अजूनही कुणालाच पचनी पडत नव्हती. चालते-फिरते चैतन्य असलेले, सतत कार्यमग्न असणारे हे नेतृत्व आज कायमचे शांत झाले होते.
दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व स्तरांतील लोक आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा नमस्कार करण्यासाठी आले होते. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू, तर अनेकांच्या ओठांवर “दादा…दादा…” असा आर्त आक्रोश ऐकू येत होता. हा जनसागर म्हणजे दादांच्या कर्तृत्वाची, त्यांच्या कष्टांची आणि त्यांनी कमावलेल्या अपार प्रेमाची खरी पावती होती.
या शोकसभेला ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह केंद्रीय पातळीवरील अनेक मान्यवर, विविध राज्यांतील नेते, राज्य मंत्रिमंडळातील सहकारी, महायुतीतील तसेच विरोधी पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
अजितदादांचे कार्य केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते; त्यांनी शेतकरी, कष्टकरी, उद्योग, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि राज्याच्या अर्थकारणाला नवी दिशा दिली. त्यामुळेच आज त्यांचा निरोप हा केवळ एका नेत्याचा निरोप नसून, महाराष्ट्राच्या एका युगाचा अंत असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत होती. आज बारामतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला दिसत होता. दादांच्या आठवणी, त्यांची निर्णयक्षमता, कठोर पण लोकाभिमुख नेतृत्व आणि कामातून बोलणारी शैली कायम जनतेच्या स्मरणात राहणार आहे.