Home Breaking News पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार हरपले; अजित पवारांच्या निधनाने उद्योगनगरी पोरकी झाल्याची तीव्र भावना

पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार हरपले; अजित पवारांच्या निधनाने उद्योगनगरी पोरकी झाल्याची तीव्र भावना

पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे, शहराला आधुनिकतेची दिशा देणारे आणि “बारामती माझी जन्मभूमी, पिंपरी-चिंचवड माझी कर्मभूमी” असे अभिमानाने सांगणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण उद्योगनगरी शोकसागरात बुडाली आहे. शहराच्या रस्त्यांपासून ते रुग्णालयांपर्यंत, पाण्यापासून ते सार्वजनिक वाहतुकीपर्यंत—अजित पवारांच्या नेतृत्वाखाली घडलेला विकास आज प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यांसमोर उभा राहिला आहे.
१९९१–९२ च्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघातून राजकीय वाटचाल सुरू करत अजित पवारांचा पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात प्रवेश झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सलग १५ वर्षे एकहाती सत्ता शहरात प्रस्थापित करत त्यांनी महापालिकेला विकासाचे प्रभावी साधन बनवले. भविष्यातील गरजांचा वेध घेत शहर विकासाचा दूरदृष्टीपूर्ण आराखडा त्यांनी आखला—जो आजही शहराच्या वाढीचा पाया आहे.
अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने ई-सुविधा प्रणाली, ऑनलाईन बिल भरणा, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा व जलनिस्सारण प्रकल्प, झोपडपट्टी पुनर्वसन, जेएनयूआरएम अंतर्गत गरीबांसाठी गृहप्रकल्प, निगडी ओटास्कीम अशा अनेक योजनांना गती दिली. २६०० कोटी रुपयांच्या केंद्रीय निधीमुळे शहरातील रस्ते, बस वाहतूक, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा यांचा दर्जा उंचावला.
वाहतूक कोंडीमुक्तीसाठी उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, भुयारी मार्ग, पादचारी पूल उभारले गेले. निगडी–दापोडी, औंध–रावेत, नाशिक फाटा–वाकड, काळेवाडी फाटा–देहू-आळंदी अशा बीआरटी कॅरिडॉरमुळे दळणवळणाला नवी दिशा मिळाली. स्पाईन रोड, डांगे चौक, जगताप डेअरी, काळेवाडी फाटा येथील उड्डाणपूल हे शहराच्या वेगवान प्रवासाचे प्रतीक ठरले.
उद्योगनगरीचा दर्जा उंचावण्यासाठी पिंपरी-चिंचवड ऑटो क्लस्टर, संशोधनाला चालना देणारा सायन्स पार्क, मोशीतील पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर, मध्यवर्ती ट्रेड सेंटर—हे सारे प्रकल्प अजित पवारांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात. भक्ती-शक्ती उद्यान, आचार्य अत्रे सभागृह, उद्यानांचा विकास, मेट्रो प्रकल्प—शहराच्या सांस्कृतिक व पायाभूत उन्नतीचे टप्पे ठरले.
आरोग्य क्षेत्रात ७०० खाटांचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय तसेच पाच सुसज्ज रुग्णालयांनी नागरिकांना दिलासा दिला. पाणीपुरवठ्यासाठी स्काडा प्रणाली, भामा-आसखेड व आंद्रा धरणातील आरक्षित साठा, बंदिस्त पवना जलवाहिनी प्रकल्प—स्वच्छ, शुद्ध पाण्याची दूरगामी तरतूद करण्यात आली.
महिला, युवक, कामगार, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी बचत गटांद्वारे बिनव्याजी कर्ज, शिवणयंत्र वाटप, ड्रायव्हिंग व संगणक प्रशिक्षण अशा योजना राबवून सामाजिक समावेशाला बळ देण्यात आले. भल्या पहाटे शहरात येऊन कामांची पाहणी, गुणवत्तेशी कधीही तडजोड न करण्याची शिस्त—यामुळे प्रशासनावर वचक राहिला आणि कामांचा दर्जा उंचावला.
आज या सर्व आठवणींनी पिंपरी-चिंचवडचे नागरिक अश्रूंनी भरून गेले आहेत. शहरावर मनापासून प्रेम करणारा नेता हरपल्याची हळहळ सर्वत्र व्यक्त होत आहे. उद्योगनगरीला आधुनिकतेचा चेहरा देणारे हे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले असले, तरी त्यांनी घडवलेले पिंपरी-चिंचवड त्यांच्या कार्याची अमिट साक्ष देत राहील.