पुणे | प्रतिनिधी पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून गुरुवार, २९ फेब्रुवारी रोजी शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रे, टाक्या आणि पंपिंग स्टेशनमध्ये तातडीची विद्युत व पंपिंग दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे गुरुवार रात्री ११ वाजल्यापासून शुक्रवार, ३० फेब्रुवारी रात्री ११ वाजेपर्यंत शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा सुरू झाला तरी अनेक भागांत कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आधीच आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या कालावधीत पर्वती नवीन व जुने जलशुद्धीकरण केंद्र, त्याअंतर्गत येणाऱ्या एमएलआर, एचएलआर आणि एलएलआर टाक्या, पर्वती टँक पॉईंट, वडगाव जलशुद्धीकरण केंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, लष्कर, चिंचवली, वारजे जलकेंद्र तसेच वडगाव जलकेंद्राशी संबंधित टाक्या व पंपिंग व्यवस्थेची दुरुस्ती व देखभाल केली जाणार आहे. यासाठी विद्युत पुरवठा व पंपिंग यंत्रणा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येणार आहे.
यामुळे गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, कसबा पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, सोमवारी पेठ, लोहियानगर, घोरपडे पेठ, पर्वती दर्शन, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट परिसर, तसेच सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, शिवदर्शन, गंगाधाम, टिळक वसाहत, कोंढवा खुर्दचे काही भाग अशा मोठ्या परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
याशिवाय हिंगणे, आनंदनगर, धायरी, आंबेगाव पठार, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, येवलेवाडी, तसेच खराडी, चंदननगर, वडगावशेरी, सुनीतानगर, आनंदपार्क, यशवंतनगर, राजश्री कॉलनी, महादेवनगर आदी भागांनाही या पाणीपुरवठा बंदचा फटका बसणार आहे.
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारपासून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल. तोपर्यंत नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.