Home Breaking News चंद्रपूरमध्ये भव्य तिरंगा स्केटिंग रॅली; लहान स्केटर्सच्या राष्ट्रीय कामगिरीचा गौरव

चंद्रपूरमध्ये भव्य तिरंगा स्केटिंग रॅली; लहान स्केटर्सच्या राष्ट्रीय कामगिरीचा गौरव

48
0
चंद्रपूर | प्रतिनिधी
स्केटिंग असोसिएशन ऑफ चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा स्केटिंग रॅलीचा शुभारंभ शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथून मोठ्या उत्साहात करण्यात आला. देशभक्ती, क्रीडासंस्कृती आणि युवा शक्तीचे दर्शन घडवणाऱ्या या रॅलीत सहभागी स्केटर्सनी तिरंग्याच्या साक्षीने शहरात अभिमानाचा संदेश पोहोचवला.
या प्रसंगी महाराष्ट्रातील विविध स्केटिंग स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या १२५ पेक्षा अधिक लहान मुलांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व विशेष कौतुक करण्यात आले. या मुलांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर राज्य व देशपातळीवर चंद्रपूरचे नाव उज्ज्वल केल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
चंद्रपूर ही वाघांची भूमी असली, तरी येथील मुले वाघापेक्षाही अधिक पराक्रमी असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले. जिल्ह्यातील मुले केवळ शिक्षणातच नव्हे तर प्रत्येक खेळात पुढे येणे अत्यंत आवश्यक असून, मैदानात खेळणारी मुलेच जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी होतात, असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. मोबाईलमध्ये गुंतण्यापेक्षा मैदानी खेळांकडे वळणारी पिढी घडवणे ही आजच्या काळाची गरज असल्याचेही नमूद करण्यात आले.
जिल्ह्यात क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडून भरीव पावले उचलली जात असून, दाताळा येथे १३७ कोटी रुपये खर्चून स्वातंत्र्यसैनिक वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने अत्याधुनिक स्टेडियम उभारण्यात येत आहे. यामुळे भविष्यात चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंना सराव व स्पर्धांसाठी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध होणार असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवण्यास मोठी मदत होणार आहे.
या भव्य तिरंगा स्केटिंग रॅलीस मनःपूर्वक सदिच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमास राहुल पावडे, प्रमोद शास्त्रकार, श्री. तिवारी, श्रीमती गर्ग मॅडम, तसेच विद्यार्थी, पालक आणि क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीमुळे शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले असून, चंद्रपूरची क्रीडाशक्ती पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली आहे.