Home Breaking News पुणे रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा बदल; नांदेड–पुणे व हरंगुळ एक्स्प्रेस आता हडपसरपर्यंतच

पुणे रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा बदल; नांदेड–पुणे व हरंगुळ एक्स्प्रेस आता हडपसरपर्यंतच

47
0
पुणे | प्रतिनिधी
पुणे शहराकडे प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, पुण्यात येणाऱ्या दोन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या टर्मिनलमध्ये बदल करण्यात आला आहे. हुजूर साहिब नांदेड–पुणे एक्स्प्रेस आणि पुणे–हरंगुळ–पुणे एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या आता पुणे स्टेशनऐवजी हडपसर रेल्वे स्थानकावरच थांबणार असल्याची माहिती पुणे रेल्वे विभागाने दिली आहे. हा बदल २६ जानेवारीपासून अंमलात आला आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १७६३० हुजूर साहिब नांदेड–पुणे एक्स्प्रेस ही आता पहाटे ०४:३५ वाजता हडपसर स्थानकावर पोहोचेल. यापूर्वी ही गाडी थेट पुणे स्टेशनवर येत होती. त्यामुळे पुणे स्टेशन परिसरात उतरणाऱ्या प्रवाशांना आता हडपसरवर उतरून पुढील प्रवासाची व्यवस्था करावी लागणार आहे.
हडपसरहून पुणे स्टेशनकडे जाण्यासाठी प्रवाशांसाठी गाडी क्रमांक ११४२२ सोलापूर–पुणे डेमू ट्रेन हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही डेमू ट्रेन हडपसर स्थानकावरून सकाळी ५.२५ वाजता सुटते. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मात्र, या बदलामुळे काही प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. पहाटे हडपसर स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांसाठी पीएमपीएमएल बससेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना रिक्षा किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याची तक्रार करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना अव्वाच्या सव्वा भाड्याचा आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
तसेच, डेमू ट्रेनसाठी किमान एक तास स्थानकावर थांबावे लागते, त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी हा निर्णय गैरसोयीचा ठरत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. काही प्रवासी संघटनांनी हा टर्मिनल बदल तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, पुणे रेल्वे विभागाने प्रवाशांनी प्रवासापूर्वी नव्या वेळापत्रकाची माहिती घ्यावी आणि पर्यायी प्रवास व्यवस्थेची योग्य तयारी करावी, असे आवाहन केले आहे.