Home Breaking News वांद्रे स्कायवॉक अखेर सज्ज! प्रवाशांना मोठा दिलासा, 26 जानेवारीपासून वापरासाठी खुला

वांद्रे स्कायवॉक अखेर सज्ज! प्रवाशांना मोठा दिलासा, 26 जानेवारीपासून वापरासाठी खुला

40
0
मुंबई | प्रतिनिधी
मुंबईतील पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. वांद्रे पूर्व येथील बहुप्रतीक्षित स्कायवॉक अखेर पूर्ण झाला असून, येत्या 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर तो सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. 2019 पासून रखडलेल्या या प्रकल्पामुळे लाखो प्रवाशांना होणारा त्रास आता संपणार आहे.
हा स्कायवॉक बीएमसीने उभारलेला असून, तो थेट वांद्रे स्टेशन रोड ओलांडत महामार्गाला जोडतो आणि कलानगर जंक्शन येथे उतरतो. त्यामुळे वांद्रे कोर्ट, वांद्रे-कुर्ला संकुल (BKC), म्हाडा कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ, श्रम आणि त्रास मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. विशेषतः नोकरदार, विद्यार्थी आणि न्यायालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी हा स्कायवॉक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
जुना पूल पाडून नवा अत्याधुनिक स्कायवॉक
हा स्कायवॉक शहरातील सर्वात जुन्या पुलांपैकी एक होता. मात्र, तो अत्यंत दुरावस्थेत गेल्यामुळे 2021 मध्ये पाडण्यात आला होता. त्यानंतर नव्या आणि सुरक्षित पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले. डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत असूनही काही तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे काम रखडले होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर कामाला वेग देत अखेर हे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
 फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान
पूर्वीच्या स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. नव्या पुलावर अशा प्रकारचे अतिक्रमण होऊ नये, यासाठी महानगरपालिकेसमोर मोठे आव्हान आहे. वांद्रे कोर्ट ते रेल्वे स्थानक हा परिसर अत्यंत वर्दळीचा असल्याने, पादचारी सुरक्षेला प्राधान्य देत फेरीवाल्यांवर कठोर नियंत्रण ठेवणे गरजेचे ठरणार आहे.
 वाहतूक कोंडीतून सुटका, सुरक्षित प्रवासाचा नवा मार्ग
या स्कायवॉकमुळे रस्त्यावरची गर्दी, वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका कमी होणार असून, पादचाऱ्यांना सुरक्षित आणि जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात हा स्कायवॉक दैनंदिन प्रवासात मोठी सोय निर्माण करेल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.