पुणे महानगरपालिकेच्या ज्युनियर अभियंता (JE) पदासाठी 25 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेबाबत उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राज्यातील बहुतांश स्पर्धा परीक्षा सुरक्षित, अधिकृत आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या TCS iON केंद्रांवर घेतल्या जात असताना, पुणे मनपाने ही महत्त्वाची परीक्षा अचानक कमी दर्जाच्या खाजगी केंद्रांवर घेण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
उमेदवारांनी भरमसाठ परीक्षा शुल्क भरले असतानाही त्यांना परीक्षा केंद्रासाठी 300 ते 400 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे प्रवासाचा अतिरिक्त खर्च, निवासाची अडचण, वेळेचा अपव्यय आणि मानसिक ताण वाढल्याची भावना परीक्षार्थींनी व्यक्त केली आहे. काही उमेदवारांनी तर या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांवर अधिक अन्याय होत असल्याचेही नमूद केले आहे.
सुरक्षितता, पारदर्शकता आणि तांत्रिक सुविधा या दृष्टीने कमी दर्जाची केंद्रे परीक्षेसाठी योग्य नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. परीक्षा प्रक्रियेत कोणतीही अनियमितता किंवा तांत्रिक अडचण उद्भवल्यास त्याचा थेट फटका उमेदवारांच्या भवितव्यावर बसू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे हा निर्णय तात्काळ रद्द करून परीक्षा अधिकृत, विश्वासार्ह आणि राज्यस्तरीय मान्यता प्राप्त केंद्रांवरच घेण्यात यावी, अशी ठाम मागणी उमेदवारांनी केली आहे.
“विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ नको,” असा स्पष्ट संदेश देत अनेक उमेदवारांनी प्रशासनाला निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकता आणि समान संधी अबाधित राहण्यासाठी पुणे मनपाने त्वरित सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा आता सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.