Home Breaking News ग्रँड टूरमुळे पुणेकरांची ‘ग्रँड’ कोंडी; वाहतूक नियोजन फसलं, नागरिकांचा संताप

ग्रँड टूरमुळे पुणेकरांची ‘ग्रँड’ कोंडी; वाहतूक नियोजन फसलं, नागरिकांचा संताप

34
0
पुणे शहरात मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेमुळे सोमवारी सामान्य पुणेकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. स्पर्धेच्या निमित्ताने करण्यात आलेल्या वाहतूक बदलांचे नियोजन अत्यंत ढिसाळ ठरल्याने शहरात अभूतपूर्व ट्रॅफिक जाम झाला. “हा रस्ता बंद, तो रस्ता बंद… मग आम्ही जायचं तरी कसं?” असा सवाल करत संतप्त पुणेकरांनी आपला राग व्यक्त केला.
स्पर्धेसाठी शहरातील प्रमुख मार्ग, चौक आणि अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. अनेक ठिकाणी मार्ग वळवण्यात आले असले, तरी पर्यायी रस्त्यांची क्षमता लक्षात न घेता वाहतूक वळवल्याने काही मिनिटांतच परिस्थिती हाताबाहेर गेली. सकाळपासून दुपारपर्यंत अनेक भागांत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मध्यवर्ती पुण्यासह कोथरूड, शिवाजीनगर, औंध, बाणेर, हडपसर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातही कोंडीचे तीव्र परिणाम जाणवले.
कामावर जाणारे नोकरदार, शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांचे वाहनचालक सर्वाधिक अडचणीत सापडले. काही नागरिक तासन्‌तास एकाच ठिकाणी अडकून पडल्याने त्यांच्या नियोजित कामांवर पाणी फिरले. “पूर्वसूचना दिली होती, पण प्रत्यक्षात रस्त्यावर उतरल्यावर सगळंच कोलमडलं,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिली.
वाहतुकीचे तीन-तेरा वाजल्याने अनेक ठिकाणी नागरिक आणि पोलीस प्रशासनात शाब्दिक वादाचे प्रसंग घडले. “स्पर्धा घ्यायला आमचा विरोध नाही, पण नियोजन नसल्यामुळे आम्हालाच वेठीस का धरलं जातं?” असा सवाल संतप्त पुणेकर विचारत होते. सोशल मीडियावरही प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर टीकेची झोड उठली असून, ट्रॅफिक जामचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले.
शहरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा होणे ही अभिमानाची बाब असली, तरी त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणे योग्य नाही, अशी भावना आता ठळकपणे व्यक्त होत आहे. भविष्यात अशा मोठ्या कार्यक्रमांसाठी अधिक सक्षम, स्पष्ट आणि नागरिकाभिमुख वाहतूक नियोजन करण्याची मागणी पुणेकरांकडून जोर धरत आहे.