पुणे: पुणे महानगरपालिकेसह राज्यातील २८ महानगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र, या निकालांमधून एक ऐतिहासिक आणि चर्चेचा विषय ठरलेला विजय समोर आला असून, पुणे महापालिकेतील राघवेंद्र उर्फ बापू मानकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
महात्मा फुले मंडई, प्रभाग क्रमांक २५ मधून निवडणूक लढवणाऱ्या मानकर यांनी तब्बल २६ हजार ४७७ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. विशेष बाब म्हणजे, मानकर यांच्या नावावर कोणतीही आलिशान वाहने, मोठा वाडा किंवा राजकीय वारसा नाही. त्यांच्या नावावर केवळ एक अँब्युलन्स आहे. तरीही त्यांनी थेट आमदार, खासदारांच्या मुलांनाही मागे टाकत हा ऐतिहासिक पराक्रम साधला.
या प्रभागातील चारही जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. संपूर्ण पुणे महापालिकेत भाजपने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) यांच्या मदतीने १११ जागा जिंकत पहिला क्रमांक पटकावला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २७ जागांसह दुसऱ्या, काँग्रेस २५ जागांसह तिसऱ्या, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ३ आणि शिवसेना (ठाकरे गट) एका जागेवर समाधान मानावे लागले.
मानकर यांच्या विजयामागे त्यांचे सामाजिक कार्य, सर्वसामान्यांशी असलेले थेट नाते आणि सातत्याने केलेली जनसेवा हे प्रमुख कारण मानले जात आहे. त्यांनी आरोग्यसेवा, आपत्कालीन मदत आणि गरजूंसाठी अँब्युलन्सच्या माध्यमातून केलेले काम नागरिकांच्या मनात खोलवर रुजले आहे. त्यामुळे ‘साधेपणा, सेवा आणि संवेदनशीलता’ यांचे प्रतीक ठरलेल्या मानकरांना मतदारांनी भरभरून पाठिंबा दिला.
संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान पहिल्यांदाच पुण्याच्या उमेदवाराला मिळाला आहे. हा विजय केवळ एका प्रभागाचा नसून, सामान्य माणसाच्या ताकदीचा, विश्वासाचा आणि प्रामाणिक सेवेचा विजय असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
हा निकाल दाखवतो की, मोठे नाव, राजकीय घराणे किंवा प्रचंड पैसा नसतानाही, लोकांच्या हृदयात स्थान मिळवता आले तर जनतेचा विश्वास संपादन करता येतो. राघवेंद्र उर्फ बापू मानकर यांचा हा विजय महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा आदर्श निर्माण करणारा ठरला आहे.