पुणे (दि. 21): पुणे ग्रँड चॅलेंज टूर–2026 या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या चौथ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व सरकारी व खाजगी शाळांसाठी विशेष आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी दिलेल्या आदेशानुसार, 23 जानेवारी रोजी सर्व शाळा दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहतील आणि त्यानंतर शाळा बंद ठेवण्यात येतील.
या स्पर्धेचा चौथा टप्पा बालेवाडी ते बालगंधर्व रंगमंदिर या मार्गावर आयोजित करण्यात आला असून, या टप्प्याचे एकूण अंतर सुमारे 58 किलोमीटर आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक निर्बंध लागू होणार असून, शहरातील प्रमुख रस्त्यांवर काही वेळासाठी वाहतूक पूर्णतः बंद किंवा वळवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. विशेषतः दुपारनंतर शाळा सुटण्याच्या वेळेत पालकांना मुलांना घरी आणण्यासाठी अडचणी येऊ नयेत, तसेच शाळा बसेस, रिक्षा आणि खासगी वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे.
पुणे ग्रँड चॅलेंज टूर ही भारतातील पहिली UCI-रेटेड आंतरराष्ट्रीय रोड सायकलिंग स्टेज रेस असून, या स्पर्धेमुळे पुण्याला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळणार आहे. देश-विदेशातील खेळाडू, संघ, अधिकारी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने शहरात दाखल होणार असल्याने, प्रशासनाकडून सुरक्षेची व वाहतूक व्यवस्थेची विशेष तयारी करण्यात आली आहे.
महापालिका, पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून या स्पर्धेचे नियोजन केले जात असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पुणेकरांच्या सहकार्यामुळे हा आंतरराष्ट्रीय क्रीडा सोहळा यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.