Home Breaking News “पुणे ग्रँड चॅलेंज टूर” सायकल स्पर्धेसाठी पुण्यात मोठी तयारी; १९ जानेवारी रोजी...

“पुणे ग्रँड चॅलेंज टूर” सायकल स्पर्धेसाठी पुण्यात मोठी तयारी; १९ जानेवारी रोजी प्रमुख रस्त्यांवर वाहतूक निर्बंध, पर्यायी मार्ग जाहीर

पुणे : पुणे जिल्हा प्रशासन व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (CFI) यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या “पुणे ग्रँड चॅलेंज टूर” या भव्य आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी पुणे शहर सज्ज झाले आहे. ही स्पर्धा १९ जानेवारी ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान पार पडणार असून, १९ जानेवारी रोजी पुणे शहरातून “प्रोलॉग” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रोलॉग स्पर्धेदरम्यान शहरातील फर्ग्युसन कॉलेज रोड, विद्यापीठ रोड, जंगली महाराज रोड तसेच या मार्गांना जोडणारे उपरस्ते काही कालावधीसाठी वाहनविरहित व मनुष्यविरहित ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याची माहिती पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त श्री. हिंमत जाधव यांनी दिली आहे.
वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी यासाठी मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार विशेष अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे. १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० या कालावधीत आवश्यकतेनुसार खंडोजी बाबा चौक ते डेक्कन जिमखाना बस डेपो या संपूर्ण मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
या मार्गामध्ये खंडोजी बाबा चौक, गुडलक चौक, तुकाराम महाराज पादुका चौक, ललित महल चौक, वीर चाफेकर चौक, सुर्यमुखी दत्त मंदिर चौक, रेंज हिल्स जंक्शन, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, बालगंधर्व चौक ते डेक्कन जिमखाना बस स्टँड या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. या संपूर्ण मार्गावर स्पर्धेच्या कालावधीसाठी “नो-पार्किंग झोन” लागू करण्यात येणार असून, दोन्ही बाजूंनी वाहन उभे करण्यास बंदी राहील. अत्यावश्यक सेवेतील वाहने – जसे की अग्निशमन दल, पोलीस वाहने, रुग्णवाहिका तसेच स्पर्धेशी संबंधित अधिकृत वाहने – यांना मात्र परवानगी देण्यात येणार आहे.
वाहनचालकांच्या सोयीसाठी विविध पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले असून, स्वारगेट, खडकी, विद्यापीठ चौक, सादलबाबा चौक, नळस्टॉप, एस.बी. रोड, सेनापती बापट रोड, वाकडेवाडी, आरटीओ चौक, शनिवार वाडा परिसरातील वाहने वेगवेगळ्या मार्गांनी वळविण्यात येणार आहेत. नागरिकांनी या पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
“पुणे ग्रँड चॅलेंज टूर” ही स्पर्धा केवळ क्रीडा क्षेत्रापुरती मर्यादित नसून, पुण्याची जागतिक ओळख अधिक भक्कम करणारी आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धेमुळे शहराच्या पर्यटन, क्रीडा संस्कृती आणि आरोग्यदायी जीवनशैलीला मोठी चालना मिळणार आहे. पुणेकरांनी या उपक्रमाचे स्वागत करत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.