पुणे : पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या मतमोजणीदरम्यान सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पुणे पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. हडपसर येथील साधना विद्यालय येथे सुरू असलेल्या मतमोजणी प्रक्रियेच्या वेळी काही उमेदवारांसोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकलच्या सायलेंसरमध्ये बेकायदेशीर बदल करून प्रचंड मोठा व कर्कश आवाज निर्माण केला. तसेच कर्कश हॉर्न वाजवून परिसरात गोंधळ आणि तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या प्रकारांमुळे मतमोजणी केंद्रात गोंधळ उडण्याची आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची गंभीर शक्यता होती. मात्र, बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिस अधिकारी व अंमलदारांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून तात्काळ व प्रभावी कारवाई केली. या कारवाईत एकूण १९ मोटारसायकल (बुलेट, यामाहा आदी वाहनांचा समावेश) ताब्यात घेण्यात आल्या असून, संबंधित वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यासह इतर लागू कायद्यांनुसार कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईअंतर्गत उल्लंघन करणाऱ्यांकडून एकूण ९६,७०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या या तत्परतेमुळे मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडण्यास मदत झाली.
पोलिस विभागाने विशेषतः तरुणांना आवाहन केले आहे की, “वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करू नयेत, कर्कश हॉर्नचा वापर टाळावा आणि सार्वजनिक शांततेस बाधा आणणारी कोणतीही कृती करू नये. अशा प्रकारांमुळे स्वतःवर कारवाई तर होतेच, शिवाय समाजात अस्थिरता निर्माण होऊ शकते.”
ही प्रशंसनीय कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परि-६ डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्री. अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन श्री. संजय मोगले, पोनि (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या सूचनांनुसार करण्यात आली. या कारवाईत तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार दीपक कांबळे, भाऊसाहेब खटके, निलेश किरवे, बापू लोणकर, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, अजित मदने, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलिक केसकर, महावीर लोढे, आकाश धावडे, विजय कानेकर, धीरज शेलार यांच्या पथकाने अत्यंत तत्परतेने आणि शिस्तबद्धरीत्या कामगिरी बजावली.
या घटनेमुळे एक स्पष्ट संदेश गेला आहे की, लोकशाही प्रक्रियेच्या काळात गोंधळ, ध्वनी प्रदूषण किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकाराला अजिबात थारा दिला जाणार नाही. पुणे पोलिसांची ही कारवाई शांतता, शिस्त आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणारी ठरली आहे.