पिंपरी, दि. १२ जानेवारी २०२६ : पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मतदान जनजागृती उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत निगडी सेक्टर २६ येथील डॉ. हेडगेवार भवन येथे सफाई सेवकांसाठी विशेष मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये शहराच्या स्वच्छतेची धुरा सांभाळणाऱ्या सफाई सेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत मतदानाची शपथ घेत लोकशाहीप्रती आपली कटिबद्धता व्यक्त केली.





