Home Breaking News “कायदा रक्षक की कायदा भक्षक?” – नवी मुंबईतील AHTU पोलीस कर्मचाऱ्याचा डान्स...

“कायदा रक्षक की कायदा भक्षक?” – नवी मुंबईतील AHTU पोलीस कर्मचाऱ्याचा डान्स बारमधील व्हिडिओ व्हायरल, जनतेत संताप; तातडीच्या चौकशीची मागणी

60
0
नवी मुंबईतील AHTU (Anti Human Trafficking Unit) मध्ये कार्यरत असलेला एक पोलीस कर्मचारी कोपरखैरणे येथील नटराज डान्स बारमध्ये महिलांवर पैसे उधळताना दिसत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. समाजाचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेत कार्यरत असलेला कर्मचारी अशा प्रकारे वागत असल्याचे दृश्य समोर आल्याने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मानवी तस्करीविरोधी पथकात कार्यरत असलेला अधिकारी अशा ठिकाणी कसा काय आढळतो? ज्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीत संशय निर्माण होतो, तिथेच कायद्याचे रक्षण करणारे कर्मचारी दिसल्यास पोलीस यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. “कायदा रक्षक की कायदा भक्षक?” असा सवाल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर उपस्थित केला जात आहे.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विविध सामाजिक संघटना, जागरूक नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून संबंधित कर्मचाऱ्याविरोधात तात्काळ व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. “जर हा व्हिडिओ खरा असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर असून, केवळ निलंबन नव्हे तर कठोर शिस्तभंगाची कारवाई झालीच पाहिजे,” असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
पोलीस दल ही समाजाची संरक्षण भिंत आहे. सामान्य नागरिक कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास ठेवून आपले दैनंदिन जीवन जगतात. मात्र अशा प्रकारच्या घटनांमुळे हा विश्वास डळमळीत होतो. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेतच शिस्त आणि नैतिकतेचा अभाव दिसू लागल्यास, समाजात चुकीचा संदेश जातो.
म्हणूनच या प्रकरणात केवळ खुलासा पुरेसा नसून, निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणणे आणि दोषी आढळल्यास उदाहरणार्थ कठोर कारवाई करणे अत्यावश्यक ठरणार आहे. ही घटना केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित न राहता, संपूर्ण यंत्रणेच्या प्रतिमेशी संबंधित असल्याने वरिष्ठ स्तरावरून याची गंभीर दखल घेतली जावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. पोलीस दलाची विश्वासार्हता टिकवण्यासाठी आणि समाजात योग्य संदेश देण्यासाठी या प्रकरणात तातडीने ठोस पावले उचलली जाणे गरजेचे आहे.